एकेकाळी मंदिरात येणाऱ्या भाविकांचे काढायचे फोटो, आज आहेत ६५०० कोटींच्या कंपनीचे मालक By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 08:34 AM 2023-12-31T08:34:24+5:30 2023-12-31T08:46:46+5:30
इंटेक्स टेक्नॉलॉजीसची आज भारतातील आघाडीच्या मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मिती कंपन्यांमध्ये गणना केली जाते. इंटेक्स टेक्नॉलॉजीसची (Intex Technologies) आज भारतातील आघाडीच्या मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मिती कंपन्यांमध्ये गणना केली जाते. कंपनीचे संस्थापक नरेंद्र बन्सल यांच्या मेहनतीमुळे कंपनीनं हे स्थान मिळवलंय. त्यांनी ही कंपनी केवळ २ हजार रुपयांमध्ये सुरू केली. आज ही कंपनी ६५०० कोटींहून अधिक किमतीची कंपनी बनलीये.
इंटेक्स ही देशातील मोबाइल फोन उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. एक असा काळ होता जेव्हा कंपनीचे संस्थापक दि्लीतील बिर्ला मंदिरात लोकांचे फोटो क्लिक करायचे. यानंतर ते चावीच्या किचेनमध्ये चिकटवून त्याची विक्री करत होते. पण त्यांना आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती.
स्वत:चा आणि अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी ऑडिओ-व्हिडीओ कॅसेट विकल्या. त्यांना लहानपणापासूनच व्यवसाय करण्याची इच्छा होती. त्यामुळेच त्यांनी अनेक व्यवसायात हात आजमावला. एकेकाळी ते दिल्लीतील नया बाजार, चांदनी चौक येथे कॉर्डलेस फोनचा व्यवसाय करायचे. त्यात पुढे काही संधी नसल्याचं पाहून त्यांनी ते बंद करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे नरेंद्र बन्सल यांनी तरुण वयातच अनेक व्यवसायात हात आजमावला आणि त्याचा त्यांना फायदाही झाला.
भारतात आयटी उद्योगाचा विस्तार होत होता. त्याच वेळी नरेंद्र बन्सल यांनी दिल्लीच्या नेहरू प्लेस मार्केटमध्ये कॉम्प्युटर फ्लॉपी डिस्क आणि इतर उपकरणं विकण्याचं काम केलं. यात त्यांना मोठा नफाही झाला. यानंतर त्यांनी आपला व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला आणि १९९२ मध्ये नेहरू प्लेसमध्ये एक छोटेसं भाड्याचं दुकान घेतलं आणि नंतर येथे कम्प्युटर असेंबल करण्यास सुरुवात केली. यानंतर वर्षभरात म्हणजे १९९३ मध्ये त्यांनी इंटरनॅशनल इम्पेक्स नावाची कंपनी स्थापन केली.
नरेंद्र बन्सल यांनी १९९६ मध्ये इंटेक्स टेक्नॉलॉजीजची स्थापना केली. चीन आणि दक्षिण कोरियातील उत्पादक आणि होलसेलर्सकडून ते आपले प्रोडक्ट मागवत असत. यामुळे ते इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त होते. म्हणून त्यांच्या कंपनीला पहिल्याच वर्षी ३० लाख रुपयांचा नफा झाला.
यानंतर त्यांनी स्पीकर, होम थिएटर, डीव्हीडी प्लेयर्स विकण्यास सुरुवात केली. १९९७ मध्ये त्यांनी दिल्लीत आपलं हेड ऑफिस सुरू केलं. यानंतर इंटेक्स टेक्नॉलॉजीनं कीबोर्ड, वेब-कॅमेरे विकायलाही सुरुवात केली. २००५ मध्ये, त्यांनी भारतातच कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू केलं.
भारतातील मोबाईल फोनची बाजारपेठ जेव्हा वेग धरू लागली तेव्हा इंटेक्सनं स्वस्त मोबाइल बाजारात आणलं. कमी बजेटमध्ये कंपनीनं टॉप फीचर्स असलेले फोन उपलब्ध करून दिले. याचा कंपनीला खूप फायदा झाला आणि इंटेक्सचं नाव लोकांसमोर आणखी मजबूतीनं आलं.
२०१२ मध्ये कंपनीनं एलईडी टीव्ही बनवण्यास सुरुवात केली. २०१२ मध्ये, त्यांचा मुलगा केशव बन्सल यानं कंपनीच्या मीडिया ब्रँडिंगवर लक्ष केंद्रित केलं. परिणामी, मोबाईल उत्पादनात इंटेक्स भारतातील मायक्रोमॅक्स नंतर दुसरी सर्वात मोठी कंपनी बनली.