अबब! OYO Hotels तब्बल १ अब्ज डॉलर्सचा IPO आणण्याच्या तयारीत; गुंतवणुकीची सुवर्ण संधी By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 09:33 AM 2021-09-24T09:33:31+5:30 2021-09-24T09:38:59+5:30
हॉटेल क्षेत्रातील मोठी चेन असलेली Oyo Hotels ही कंपनी मेगा IPO आणण्याच्या तयारीत आहे. कोरोना काळात अनेक उद्योग, व्यापार, व्यवसाय डबघाईला आले. मात्र, शेअर बाजारात अनेक कंपन्यांनी दमदार कामगिरी करत उत्तम रिटर्न देत आहे. शेअर मार्केटचीही विक्रमी घोडदौड सुरू आहे.
चालु आर्थिक वर्षांपासून शेअर बाजारात अनेकविध क्षेत्रातील कंपन्यांचे IPO येत आहेत. काही आयपीओ हीट ठरले, तर काहींची नुसतीच हवा झाल्याचे पाहायला मिळाले. आता हॉटेल क्षेत्रातील मोठी चेन असलेली Oyo Hotels ही कंपनी IPO आणण्याच्या तयारीत आहे.
कोरोना संकटाच्या काळात या कंपनीने काही चढ-उतार पाहिल्याचे सांगितले जाते. मात्र, आता Oyo Hotels सावरले असून, लवकरच तब्बल १ अब्ज डॉलर्सचा IPO बाजारात आणणार असल्याची माहिती मिळाली आहे.
OYO ही स्वस्त हॉटेल सेवा देणारी कंपनी असून, पुढील आठवड्यात सेबीला कागदपत्रे सादर करू शकते, असे म्हटले जात आहे. OYO ने IPO व्यवस्थापित करण्यासाठी जेपी मॉर्गन, सिटी आणि कोटक महिंद्रा कॅपिटल सारख्या गुंतवणूक बँकांची नियुक्ती केली आहे.
नियामक सूचनेनुसार, गेल्या आठवड्यात OYO ची मूळ कंपनी Oravel Stage च्या भागधारकांनी कंपनीला खासगी मर्यादित कंपनीतून पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतरित करण्यास मान्यता दिली.
ओरावेल स्टेजच्या बोर्डाने कंपनीचे अधिकृत भागभांडवल १.१७ कोटी रुपयांवरून ९०१ कोटी रुपये करण्यास मंजुरी दिली होती. OYO हॉटेल्सला सॉफ्टबँकचा पाठिंबा आहे आणि त्यात ४६ टक्के हिस्सा आहे.
कोरोना संकटात हॉटेल उद्योगाला मोठा फटका बसला. OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी जुलैमध्ये सांगितले की, दुसऱ्या लाटेनंतर व्यवसाय पुन्हा एकदा तेजीत येऊ लागला आहे. गेल्या महिन्यात OYO ला मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनकडून ३५० दशलक्ष डॉलरचा निधी मिळाला होता.
दरम्यान, जुलैमध्ये फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोने आयपीओ आणला होता, ज्याला गुंतवणूकदारांचा मोठा पाठिंबा मिळाला. येत्या काळात पेटीएम आणि नायका यांसारख्या कंपन्याही IPO आणत आहेत.
याशिवाय OLA कंपनी IPO आणण्याच्या तयारीत आहे. एकूणच गुंतवणूकदारांचे सर्व यशस्वी स्टार्टअप बाजारातील आयपीओच्या आगमनाकडे लक्ष ठेवून असल्याचे सांगितले जात आहे.
दुसरीकडे काही दिवसांपूर्वी OYO ने मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात असल्याचे जाहीर केले आहे. यानुसार, OYO कडून ३०० जागा नव्याने भरल्या जाणार असून. टेक प्रोफेशनल्ससाठी मोठी संधी ठरणार आहे.