Success Story : एकेकाळी फिल्म्सचे पोस्टर्सही चिकटवले, हॉटेलमध्येही केलं काम; आज आहेत ४ हजार कोटींच्या कंपनीचे मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 08:19 AM2024-04-08T08:19:28+5:302024-04-08T08:59:16+5:30

कठोर परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येतं. पण त्यासाठी मनात जिद्दही हवी. चंदूभाई विरानी यांनी शून्यातून ४ हजार कोटींची कंपनी उभी केली.

कठोर परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येतं. पण त्यासाठी मनात जिद्दही हवी. असे अनेक व्यावसायिक आहेत ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठं साम्राज्य निर्माण केलं. अशाच शून्यातून उभ्या केलेल्या कंपनीबद्दल आणि त्याच्या संस्थापकाबद्दल जाणून घेऊ.

या कंपनीचं नाव नक्कीच तुमच्या परिचयाचं असेल आणि ती कंपनी म्हणजे बालाजी वेफर्स. गुजरातच्या गल्लीतून निघून आज बालाजी वेफर्स (Balaji Wafers) हा प्रसिद्ध ब्रँड बनलाय. कंपनीचे संस्थापक चंदूभाई विरानी (Chandubhai Virani) यांनी हार न मानता मेहनतीच्या जोरावर ही कंपनी उभी केली.

एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या चंदूभाई विरानी यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला. वयाच्या १५ व्या वर्षी, चंदूभाई विराणी आणि त्यांचे कुटुंब त्यांच्या वडिलांच्या अल्प बचतीतून नवीन सुरुवात करण्याच्या आशेने ढुंडोराजीला गेले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चंदूभाईंना त्यांचे दोन भाऊ, मेघजीभाई आणि भिखूभाई यांच्यासह नव्याने सुरुवात करण्यासाठी २०००० रुपये देण्यात आले. चंदूभाई विरानी यांनी राजकोटमध्ये कृषी उत्पादनं आणि कृषी उपकरणांचा व्यवसाय सुरू केला. मात्र त्यात यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणीत भर पडली.

चंदूभाई सिनेमाच्या कॅन्टीनमध्ये काम करण्यापासून पोस्टर चिकटवण्यापर्यंतचं काम करून उदरनिर्वाह करत होते. तुटपुंज्या पगारात फाटलेल्या सिट्सही दुरुस्त करण्याचं कामही त्यांनी केले. त्यानं अनेक लहान मोठी कामं केली. भाडं न दिल्यानं त्यांना भाड्याचं राहतं घरही सोडावं लागलं होतं. मात्र, नंतर चंदूभाई यांना थकीत भाडं देण्यात यश आलं. यानंतर चंदूभाईंना सुरुवातीचे यश मिळांलं, त्यांची मेहनत पाहून त्यांना कॅन्टीनमध्ये महिन्याला एक हजार रुपयांचं कंत्राट मिळालं.

सुरुवातीच्या काळात थिएटरमध्ये वेफर्सची मागणी होती हे चंदूभाईंनी पाहिलं. त्यांनी ही संधी ओळखली आणि वेफर उद्योगात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. चंदूभाईंनी १०००० रुपयांच्या तुटपुंज्या भांडवलात त्यांच्या अंगणात तात्पुरती शेड बांधली. यामध्ये त्यांनी चिप्स तयार करण्याचे प्रयोग सुरू केले.

त्यांच्या घरी बनवलेल्या चिप्सना चित्रपटगृहातच नव्हे तर बाहेरही चांगला प्रतिसाद मिळाला. या यशानं प्रोत्साहित होऊन चंदूभाईंनी १९८९ मध्ये राजकोट येथील अजी जीआयडीसी येथे गुजरातमधील सर्वात मोठा बटाट्यांच्या वेफर्सचा कारखाना स्थापन केला. त्यांनी बँकेकडून सुमारे ५० लाख रुपयांचं कर्ज घेतलं आणि याची सुरूवात केली.

१९९२ मध्ये चंदूभाईंनी त्यांच्या भावांसोबत बालाजी वेफर्स प्रा.लि.ची स्थापना केली. कंपनीचं नाव त्यांच्या खोलीत ठेवलेल्या भगवान हनुमानाच्या छोट्या काचेच्या मूर्तीवरून प्रेरित होतं. गेल्या काही वर्षांत, बालाजी वेफर्सने देशभरातील चार कारखान्यांसह पोर्टफोलिओचा विस्तार केला. कंपनीने दररोज ६.५ मिलियन किलो बटाटे आणि १० मिलियन किलो नमकीनचं उत्पादन करत असल्याचा दावा केला आहे. आर्थिक वर्ष २०११ पर्यंत, बालाजी वेफर्सचा कथित महसूल ४००० कोटी रुपये होता.

आज बालाजी वेफर्समध्ये ५,००० कर्माचारी कार्यरत आहेत. त्यातील ५० टक्के कर्मचारी महिला आहेत. परिश्रमाच्या जोरावर कोणतीही व्यक्ती सर्वोच्च स्थानावर पोहोचू शकते हे यातून त्यानी दाखवून दिलंय.