Paytm IPO: सेबीची मंजुरी; पण लिस्टिंगपूर्वीच Paytm ला मोठा धक्का! २ हजार कोटींची प्री-IPO विक्री करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 09:39 AM2021-10-23T09:39:34+5:302021-10-23T09:45:23+5:30

Paytm IPO: देशातील आघाडीची डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमच्या आयपीओची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहात असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या Paytm च्या IPO ला अखेर सेबीकडून मंजुरी देण्यात आली आहे. देशातील आघाडीची डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमच्या आयपीओची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत आहेत.

डिजिटल वित्तीय सेवा कंपनी Paytm ला बाजार नियामक सेबीकडून १६,६०० कोटी रुपयांच्या IPO ला मंजुरी मिळाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर Paytm आपला IPO शेअर मार्केटमध्ये सादर करेल, असे सांगितले जात आहे.

Paytm आयपीओ यशस्वी झाला, तर तो आतापर्यंतचा देशातील सर्वांत मोठा IPO असेल. आतापर्यंत हा विक्रम कोल इंडियाच्या नावावर आहे. सन २०१० मध्ये IPO द्वारे १५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती.

Paytm IPO करण्यासाठी मॉर्गन स्टॅन्ले, सिटीग्रुप इंक यांना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. Paytm चे २० दशलक्षाहून अधिक व्यापारी भागीदार आहेत आणि त्याचे वापरकर्ते दरमहा १.४ अब्ज व्यवहार करतात.

Paytm चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी अलीकडेच सांगितले की, या वर्षाचे पहिले तीन महिने पेटीएमसाठी सर्वोत्तम आहेत. कोरोनामुळे डिजिटल पेमेंटमध्ये लक्षणीय वाढ झाली. अनेक कंपन्यांच्या आयपीओंना यावर्षी मोठी पसंती मिळाली आहे आणि हे पाहता पेटीएमही मजबूत गुंतवणूकदारांची अपेक्षा करत आहे.

चिनी अब्जाधीश जॅक मा यांच्या अँट ग्रुप कंपनीने यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. पेटीएमचा आयपीओ १६,६०० कोटी रुपयांचा असेल, पण मूल्यांकनाबाबत असलेल्या मतभेदांमुळे कंपनी २००० कोटी रुपयांची IPO पूर्व (प्री-आयपीओ) विक्री करण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळाली आहे.

पहिल्या गुंतवणूकदारांच्या (इनिशियल इनव्हेस्टर फिडबॅक) अभिप्रायावर आधारित कंपनी २० अब्ज डॉलर्सचे मूल्यांकन शोधत आहे, पण सल्लागारांनी या करारासाठी कमी मूल्यांकनाची शिफारस केली आहे. युनिकॉर्न ट्रॅकर फर्म सीबी इनसाइट्सच्या मते पेटीएमचे शेवटचे मूल्यांकन १६ अब्ज डॉलर होते.

Paytm आयपीओ पूर्व विक्री (प्री-आयपीओ सेल) समाप्त करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे सांगितले जात असून, कंपनी कमी मूल्यांकनावर देखील याचा विचार करू शकते, असे म्हटले जात आहे.

मॉर्गन स्टॅन्ली, गोल्डमन सॅक्स ग्रुप आयएनसी, सिटीग्रुप आयएनसीआणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज लि. या शेअर विक्रीशी जोडलेले आहेत.

सेबीकडे सादर केलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार कंपनी प्री-आयपीओ प्लेसमेंटद्वारे २० अब्ज कोटी रुपये उभारण्याचा विचार करू शकते, असे सांगितले जात आहे.

Paytm ने फोनपे, गुगल पे, अॅमेझॉन पे आणि व्हॉट्सअॅप पे या आव्हानाचा यशस्वीपणे सामना असून, Paytm स्टार्टअपने आपला व्यवसाय डिजिटल पेमेंटच्या पलीकडे बँकिंग, क्रेडिट कार्ड, वित्तीय सेवा, संपत्ती व्यवस्थापन आणि डिजिटल वॉलेटमध्ये वाढवला. देशातील व्यापारी पेमेंटमध्ये त्याचा सर्वात मोठा बाजार हिस्सा आहे, असे सांगितले जात आहे.