महागाईने जनता हैराण, पेट्रोल कंपन्यांची चंगळ; लिटरमागे होतोय १० रुपयांचा नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 12:49 PM2023-01-07T12:49:32+5:302023-01-07T12:57:46+5:30

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशावरही परिणाम झाला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशावरही परिणाम केला आहे. तर दुसरीकडे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआय सातत्याने व्याजदर वाढवत आहे. दरम्यान, इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्या पेट्रोलवर प्रतिलिटर १० रुपये इतका मोठा नफा कमवत असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे डिझेलवर कंपन्यांचा तोटाही तुलनेने कमी झाला आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, जिथे इंधन कंपन्यांना पेट्रोलमधून १० रुपये प्रति लिटर नफा मिळत आहे. त्याच वेळी, डिझेलवरील तोटाही कमी होऊन ६.५ रुपये प्रति लिटरवर आला आहे. डिझेलवरील तोटा आणि पूर्वीचा तोटा भरून काढण्यासाठी कंपन्यांनी त्यांच्या किरकोळ किंमतीत कोणतीही कपात केलेली नाही.

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ६ एप्रिल २०२२ पासून स्थिर आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी इंधन कंपन्यांनी गेल्या १५ महिन्यांत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या कपातीच्या अनुषंगाने पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमती कमी केल्या नाहीत.

ICICI सिक्युरिटीजने एका अहवालात म्हटले आहे की, २४ जून २०२२ रोजी संपलेल्या आठवड्यात सरकारी इंधन कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर १७.४ रुपये आणि डिझेलवर २७.७ रुपये प्रति लिटर इतका विक्रमी तोटा सहन करावा लागला.

तर तिसर्‍या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर 2022) कंपन्यांनी पेट्रोलच्या विक्रीवर प्रति लिटर १० रुपये नफा कमावला. तर डिझेलवरील तोटा कमी होऊन ६.५ रुपये प्रति लिटरवर आला आहे.

तिन्ही कंपन्यांनी एप्रिल २०२२ पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल केलेला नाही. एप्रिलमध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०२.९७ डॉलर्स होती, जी जूनमध्ये ११६.०१ डॉलर्स प्रति बॅरल झाली. आता ही किंमत या महिन्यात ७८.०९ डॉलर्स पर्यंत घसरली आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने आशा व्यक्त केली की, दुसऱ्या तिमाहीत विक्रमी नुकसान झाल्यानंतर या तीन कंपन्या नफ्यात येऊ शकतात.