Petrol-Diesel Price : विधानसभा निवडणुकीनंतर खिशाला लागणार कात्री; पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडणार? By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 03:47 PM 2022-02-10T15:47:30+5:30 2022-02-10T16:01:52+5:30
Petrol-Diesel Price : कमोडिटी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते. नवी दिल्ली : वाढत्या महागाईनंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. सध्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे किमती वाढत नाहीत, मात्र त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे.
कमोडिटी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची किंमत 93 डॉलरवर पोहोचली आहे, परंतु दिवाळीनंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यावेळी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 80 डॉलरच्या आसपास होती.
यानंतर यामध्ये जवळपास प्रति 13 डॉलरने वाढले आहे, परंतु देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांना प्रतिलिटर आठ ते दहा रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
...म्हणून किंमती वाढत नाहीत सध्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. अशा स्थितीत पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करून मतदारांना नाराज करण्याचा प्रयत्न सरकार करू शकत नाही. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सरकारी कंपन्यांचा वाटा 90 टक्क्यांहून अधिक आहे.
क्रूड तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ रशिया आणि युक्रेनमधील तणाव कायम असल्याने सोमवारी आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 93 डॉलरवर पोहोचल्या. 2014 नंतर पहिल्यांदाच क्रूडची किंमत एवढी पातळी गाठली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की रशिया आणि युक्रेनमधील तणाव कायम राहिला तर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 125 डॉलरपर्यंत पोहोचू शकते.
निवडणुकीनंतर होणार प्रचंड वाढ? निवडणुकीनंतर देशांतर्गत तेल कंपन्या आता होत असलेला तोटा भरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ करू शकतात. दिल्लीत सध्या पेट्रोल 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर आहे. जर तेल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय किमतींनुसार दरात वाढ केली तर दिल्लीत पेट्रोलचा दर 105 रुपयांच्या आसपास आणि डिझेलचा दर 96 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
महागाई नियंत्रणाबाहेर जाऊ शकते पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यास महागाईवर त्याचा मोठा परिणाम होईल. किमतीत प्रचंड वाढ होण्यापेक्षा दररोज होणाऱ्या किरकोळ बदलांचा सामना करणे ग्राहकांना सोपे जाते. तसेच, वाहतुकीचा खर्च किमतीत झपाट्याने वाढतो आणि त्यामुळे इतर गोष्टीही महाग होतात. त्यामुळे महागाई अनियंत्रित होऊ शकते. याचा परिणाम व्याजदर आणि आर्थिक सुधारणेवरही होऊ शकतो.