पेट्रोल पंपावर मोफत मिळणाऱ्या 'या' ६ सुविधा तुम्हाला माहित्येत का? जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 03:55 PM 2021-06-10T15:55:17+5:30 2021-06-10T15:59:28+5:30
पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी तुम्ही गेल्यानंतर पंप चालकाकडून तुम्हाला काही सुविधा पुरवणं किंवा त्या उपलब्ध करुन देणं अनिवार्य आहे. अशा नेमक्या कोणत्या सुविधा आहेत की ज्या पेट्रोल, डिझेल घेणाऱ्या ग्राहकाला मिळायला हव्यात जाणून घेऊयात... पेट्रोल, डिझेलच्या किमती आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. पण पेट्रोलशिवाय गत्यंतर नसलेल्यांना ते खरेदी केल्यावाचून दुसरा काही पर्याय देखील नाही. पण पेट्रोल किंवा डिझेल घेणाऱ्या ग्राहकांना पेट्रोल पंपावर काही सुविधा मोफत दिल्या जातात.
मार्केटिंग डिसिप्लिन गाइडलाइन्सनुसार काही नियम आखून देण्यात आले आहेत. याअंतर्गत नेमक्या कोणत्या सुविधा मिळतात हे जाणून घेऊयात.
मोफत हवा पेट्रोल पंपावर वाहनात पेट्रोल भरल्यानंतर वाहनाच्या टायरमधील हवा भरण्यासाठी एक मशीन पेट्रोल पंपाच्या बाहेर येणाऱ्या मार्गावर एका कोपऱ्यात असतं हे तुम्ही पाहिलं असेल. याठिकाणी तुम्ही तुमच्या वाहनाच्या टायरमध्ये मोफत हवा भरू शकता. पेट्रोल पंप चालकानं वाहनचालकांसाठी ही सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्याचा नियम आहे. त्यासाठी ग्राहकांकडून कोणतंही शुल्क आकारलं जाऊ शकत नाही.
पिण्याच्या पाण्याची सुविधा पेट्रोल पंपावर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा असणं किंवा ती व्यवस्था करुन देणं पेट्रोल पंप मालकासाठी अनिवार्य आहे. पेट्रोल पंपावर वाहनात पेट्रोल भरण्यासाठी आलेले ग्राहक पिण्याच्या पाण्याची मागणी करू शकतात आणि ते उपलब्ध करुन देणं पंप मालकाचं कर्तव्य आहे. यासाठी पेट्रोल पंप मालक आरओ किंवा वॉटर प्युरिफायर लावतात. काही ठिकाणी फ्रिजची देखील व्यवस्था असते. पिण्याचं पाणी मोफत उपलब्ध करुन देणं पंप मालकाची जबाबदारी आहे.
शौचालय- पेट्रोल पंपावर शौचालयची सुविधा असणार अनिवार्य आहे. ही सुविधा ग्राहकांसाठी मोफत असावी यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाऊ शकत नाही. पंप मालकानं याची काळजी घेणं बंधनकारक आहे. यासोबत पेट्रोल पंपावरील शौचालयं स्वच्छ आणि सुयोग्य असावीत. यात कोणत्याही प्रकारची अडचण ग्राहकांना येत असेल तर त्यांना तक्रार करण्याचा अधिकार आहे आणि पेट्रोल पंप मालकानं त्यावर स्पष्टीकरण देणं कर्तव्य आहे.
फोन- जर तुम्हाला आपत्कालिन परिस्थितीत कुणाला फोन करायचा असेल तर पेट्रोल पंपावर टेलिफोनची व्यवस्था असणं पेट्रोल पंप मालकांना बंधनकारक आहे. पेट्रोल पंप सुरू करण्यासोबतच पंप मालकाला एक फोन क्रमांक देखील रजिस्टर करावा लागतो. जेणेकरून पेट्रोल भरण्यासाठी येणारे ग्राहक त्याचा वापर करू शकतील.
प्राथमिक उपचार कीट फर्स्ट एड बॉक्स म्हणजेच प्राथमिक उपचार कीट पेट्रोल पंपावर उपलब्ध असणं बंधनकारक आहे. यात प्राथमिक उपचारासाठीची काही औषधं, उपकरणं यांचा समावेश असतो. प्रत्येक पेट्रोल पंप मालकाला ही सुविधा मोफत देणं अनिवार्य आहे. अचानक कोणताही अपघात घडल्यास जखमींना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी या औषधांचा उपयोग होऊ शकतो.
गुणवत्ता तपासणी पेट्रोल पंपावर तुम्हाला दिल्या जाणाऱ्या पेट्रोलची गुणवत्ता चाचणी करण्याचाही ग्राहकाला अधिकार आहे. यात तुम्ही गुणवत्तेसोबतच प्रमाणाचीही तपासणी करू शकता किंवा त्याची विचारणा करू शकता. याशिवाय पेट्रोल पंपावर आणखी काही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गोष्टी उपलब्ध असणं अनिवार्य आहे. यात आग विझवण्यासाठी लागणारी उपकरणं जसं की फायर सेफ्टी स्प्रे, रेतीनं भरलेल्या बादल्या इत्यादी.