PM Modi PSU Stocks : कोणी १०% वाढला... तर कोणी केला रकॉर्ड; PM Modiनी सांगितलेले शेअर्स बनले रॉकेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 12:34 PM2024-06-03T12:34:10+5:302024-06-03T12:48:57+5:30

PM Narendra Modi PSU Stocks : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यात अनेकदा एचएएल आणि एलआयसीसारख्या पीएसयू शेअर्सचा उल्लेख दिसून येतो आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी या शेअर्ससोबतच इतर पीएसयू स्टॉक्समध्येही तेजी दिसून येत आहे.

PM Narendra Modi PSU Stocks : शेअर बाजारानं सोमवारी नवा उच्चांक गाठत इतिहास रचला. मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक निफ्टीनं नवा उच्चांक गाठला. दरम्यान, विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आपल्या वक्तव्यांमध्ये ज्या सरकारी कंपन्यांच्या (PSU Stocks) शेअर्सचा वारंवार उल्लेख करताना दिसत होते, त्यांनी निवडणुकीच्या निकालापूर्वीच रॉकेट स्पीड पकडल्याचं दिसून आलंय. यामध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL Share) ते देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या (LIC Share) शेअरचा समावेश आहे. पाहूयात अशाच १० शेअर्सची आजची कामगिरी.

सर्वप्रथम शेअर बाजाराबद्दल बोलूया, ज्यात प्री-ओपनिंगमध्ये जोरदार वाढीची चिन्हं दिसत होती आणि बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीनं नवा उच्चांक गाठला. सकाळी ९.१५ वाजता सेन्सेक्स २०५० अंकांनी उसळत ७६०१८ वर उघडला आणि काही मिनिटांतच ७६,३३८.८९ च्या नव्या उच्चांकावर पोहोचला. तर निफ्टीनंही ६३० अंकांची झेप घेत २३,३३८.७० चा नवा उच्चांक गाठला. या काळात बीएसईचे सर्व ३० लार्जकॅप शेअर्स ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते.

आरईसी लिमिटेड : सरकारी कंपनी आरईसी लिमिटेडचा शेअर बाजार उघडताच ५७८ रुपयांवर उघडला आणि कामकाजादरम्यान १० टक्क्यांच्या वाढीसह ५९१.५० रुपयांवर व्यवहार करत होता. १.५६ लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल असलेल्या या कंपनीच्या शेअरचा हा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर आहे.

एचपीसीएल : या यादीतील दुसरा पीएसयू शेअर म्हणजे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल शेअर) ज्यानं बाजार उघडताच ७.५७ टक्क्यांनी उसळी घेतली. यानंतर तेजी आणखी वाढली आणि नंतर तो १० टक्क्यांनी वधारून ५९१ रुपयांवर व्यवहार करत होता. विशेष म्हणजे हा सरकारी शेअरही ५९४.८० रुपयांच्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.

एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड : तिसरा शेअर एनबीसीसी इंडिया लिमिटेडचा आहे, जो ७.४४ टक्क्यांच्या वादळी वाढीसह १५३ रुपयांवर व्यवहार करत आहे. २७५६० कोटी रुपयांचे बाजार भांडवल असलेल्या या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्यानं वाढ होत असून बाजार उघडताच तो १५५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला.

आयडीबीआय बँक लिमिटेड : आज आयडीबीआय बँकेच्या शेअर्सचाही जबरदस्त तेजीच्या सरकारी शेअर्सच्या यादीत समावेश झाला असून तो ६.५० टक्क्यांच्या वाढीसह ९१.९५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. बाजार उघडताच हा शेअर ७ टक्क्यांहून अधिक वाढून ९३ रुपयांवर पोहोचला.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड : हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल शेअर) शेअरचे नाव पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यात अनेकदा ऐकलं जातं आणि सोमवारी या शेअरनेही ७ टक्क्यांहून अधिक उसळी घेत ५४४४ रुपयांच्या नव्या उच्चांकी पातळीवर झेप घेतली. कामकाजादरम्यान तो ६.३५ टक्क्यांनी वधारून ५,२८९.६५ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड : बीईएल शेअरचा शेअरमध्ये तुफान तेजी असून तो ७.१६ टक्क्यांनी वधारून ३१७.१५ रुपयांवर व्यवहार करत होता. २.३१ लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेल्या या सरकारी कंपनीच्या शेअरनं बाजार उघडताच जवळपास ९ टक्क्यांनी उसळी घेत ३२३ रुपयांचा उच्चांक गाठला.

एसबीआय : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयच्या शेअरमध्येही जोरदार वाढ झाली असून सुरुवातीच्या व्यवहारात कंपनीनं जवळपास ८ टक्क्यांच्या वाढीसह ८९३.९५ रुपयांचा नवा उच्चांक गाठला. एसबीआयचे बाजार भांडवलही वाढून ७.८९ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. कामकाजादरम्यान हा शेअर ६.५५ टक्क्यांनी वधारून ८८४.७५ रुपयांवर व्यवहार करत होता.

बीईएमएल लिमिटेड : आणखी एका सरकारी कंपनी बीईएमएल लिमिटेडचा शेअर या यादीत समाविष्ट आहे. या पीएसयू कंपनीच्या शेअरनंही सोमवारी नवा उच्चांक गाठला. बाजार उघडताच तो ४८०० च्या पातळीवर उघडला आणि जवळपास ६ टक्क्यांनी वधारला. हा या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. कामकाजादरम्यान हा शेअर ४ टक्क्यांनी वधारून ४५८० रुपयांवर होता.

भारत डायनॅमिक लिमिटेड : भारत डायनॅमिक लिमिटेडबद्दल बोलायचं झालं तर या सरकारी कंपनीच्या शेअरमध्येही सुरुवातीला कामकाजादरम्यान ६ टक्क्यांची उसळी दिसून आली आणि तो १६६२.९५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर उघडला. मात्र, यानंतर त्यात काहीशी घसरण झाली आणि तो जवळपास ४ टक्क्यांनी वधारत १५९८ रुपयांवर व्यवहार करत होता.

एलआयसी : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या शेअरमध्येही जोरदार तेजी दिसून येत आहे. पंतप्रधान मोदीयांच्या वक्तव्यांमध्ये अनेकदा ज्या शेअर्सचा उल्लेख केला जातो, त्यात या शेअर्सचाही समावेश आहे. सोमवारी एलआयसीचा शेअर ४ टक्क्यांहून अधिक वाढीसह १०५८.३५ रुपयांवर उघडला आणि काही मिनिटांतच १०६० रुपयांच्या पातळीवर पोहोचला. शेअरमध्ये वाढ झाल्यानं कंपनीचं बाजार भांडवल वाढून ६.५९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. (टीप - यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)