मोदी सरकार कुठल्याही गॅरंटी शिवाय देतेय 'हे' कर्ज, आतापर्यंत 25 लाख लोकांनी केलाय अर्ज

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 19, 2020 02:13 PM2020-11-19T14:13:00+5:302020-11-19T14:25:20+5:30

कोरोना महामारीचा पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर मोठा परिणाम झाला आहे. अशा लोकांच्या मदतीसाठी केंद्रातील मोदी सरकारने स्‍वनिधि योजना सुरू केली आहे. कोरोना संकट काळात लोक या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत.

कोरोना संकट काळात 2 जुलैला या योजनेची सुरुवात करण्यात आली. पीएम स्‍वनिधी योजनेंतर्गत 25 लाखहून अधिक लोकांनी अर्ज केले आहेत. यापैकी 12 लाखहून अधिक लोकांचे अर्ज मंजूर झाले आहेत.

उत्‍तर प्रदेशातून 6.5 लाखहून अधिक लोकांनी या योजनेंतर्गत अर्ज केले आहेत. यापैकी 3.27 लाख अर्जांना मंजुरी मिळाली आहे. उत्‍तर प्रदेशात स्‍वनिधी योजनेच्या कर्जासाठी स्‍टॅम्‍प शुल्‍क माफ करण्यात आले आहे.

देशभरातील मोठ्या उद्योगांपासून ते पथविक्रेत्यांपर्यंत सर्वांनाच कोरोना संकटाचा फटका बसला आहे. उद्योग-धंधे पुन्हा सुरू झाले आहेत. मात्र, अशा लोकांचीही संख्या मोठी आहे. जे छोटे दुकान लावून आपल्या घराचा उदरनिर्वाह चालवत होते. अद्याप त्यांचा व्यवसाय सुरू झालेला नाही.

लॉकडाउनचा फटका बसलेल्या पथविक्रेत्यांना पुन्हा त्यांचा धंदा सुरू करता यावा यासाठी मोदी सरकार स्वनिधी योजनेंतर्गत पैसे उपलब्ध करून देत आहे. पीएम स्वनिधी योजना सुरू झाल्याने रस्त्यांवर दुकान लावणाऱ्या लोकांमध्ये आनंद दिसत आहे.

पीएम स्वनिधी योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना 10 हजार रुपयांचे कर्ज मिळते. यासंदर्भात, पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे, की या योजनेचा हेतू केवळ कर्ज देने एवढाच नाही, तर याकडे पथविक्रेत्यांचा संपूर्ण विकास आणि त्यांचे आर्थिक उत्थान, या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे.

पैसे नसल्याने ज्या पथविक्रेत्यांना दुकान लावण्यात अडचण येत आहे. अशांना कुठल्याही हमी शिवाय पीएम स्वनिधी योजनेंतर्गत 10,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण आपल्या जवळच्या बँकेत जाऊन, या योजनेंतर्गत कर्ज घेऊन पुन्हा आपला उद्योग सुरू करू शकता.

कोरोना संकट काळात केंद्रातील मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत 50 लाख लोकांना कर्ज देण्याचे लक्ष्य आहे.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, या योजनेंतर्गत कर्ज घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची हमी अथवा गॅरंटी देण्याची आवश्यकता नाही.