PNB च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! 1 फेब्रुवारीपासून 'या' ATM मधून पैसे काढता येणार नाहीत...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 11:05 PM2021-01-18T23:05:25+5:302021-01-18T23:17:51+5:30

नवी दिल्ली : देशातील वाढती एटीएम फसवणूक रोखण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) एक मोठे पाऊल उचलले आहे. जर तुमचेही पंजाब नॅशनल बँकेमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.

1 फेब्रुवारी 2021 पासून पंजाब नॅशनल बँकेने ग्राहक नॉन-ईएमव्ही एटीएम (Non-EMV ATM) मशीनद्वारे व्यवहार करू शकणार नाहीत.

म्हणजेच, तुम्ही नॉन-ईव्हीएम मशीनमधून पैसे काढू शकणार नाही. पंजाब नॅशनल बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती दिली आहे.

पंजाब नॅशनल बँकेने ट्विट केले की, "आपल्या ग्राहकांना फसवणूकीपासून वाचवण्यासाठी 1 फेब्रुवारी 2021 पासून पंजाब नॅशनल बँक नॉन- ईएमव्ही एटीएम मशीनमधील ट्रांजक्शनवर (financial & non-financial) प्रतिबंधित करेल. गो-डिजिटल, गो-सेफ ...!"

वाढत्या फसवणूकीच्या घटना लक्षात घेता पंजाब नॅशनल बँकेने हे पाऊल उचलले आहे. जेणेकरुन ग्राहकांचे पैसे सुरक्षित असतील. 1 फेब्रुवारीपासून ग्राहक नॉन-ईएमव्ही एटीएममधून फायन्सशियल किंवा नॉन-फायन्सशियल व्यवहार करू शकणार नाहीत.

दरम्यान, नॉन-ईएमव्ही एटीएम असे आहेत, ज्यामध्ये ट्रांजक्शनच्यावेळी कार्ड ठेवले जात नाही. यामध्ये मॅग्नेटिक स्ट्रिपच्या माध्यमातून डेटा रीड केला जातो. याशिवाय, ईएमव्ही एटीएममध्ये काही सेकंदांसाठी कार्ड लॉक केले जाते.

अलीकडेच, पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना PNBOne अ‍ॅपद्वारे त्यांचे एटीएम डेबिट कार्ड चालू / बंद करण्याची सुविधा दिली आहे.

यानुसार, तुम्ही तुमचे कार्ड वापरल्यास नसाल तर ते बंद करू शकता. यामुळे आपल्या बँक खात्यात ठेवलेले आपले पैसे सुरक्षित राहतील.