Lockdown : पोस्टाच्या 'या' योजनेत करा गुंतवणूक; दर महिन्याला होणार जबरदस्त कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 12:53 PM2020-05-11T12:53:44+5:302020-05-11T13:13:21+5:30

पोस्टाच्या योजनांमध्ये छोटी छोटी गुंतवणूकही मोठा फायदा मिळवून देते. तसेच पोस्टात गुंतवलेल्या पैशांच्या सुरक्षेचीहीसुद्धा हमी मिळते. पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत, ज्या जबरदस्त फायदा मिळवून देतात.

कोरोनाच्या संकटातही या पोस्टाच्या योजना सामान्यांसाठी आधार ठरत आहेत. पोस्टाची मासिक उत्पन्न योजनाही खास असून, तिथे गुंतवलेल्या पैशातून दरमहिन्याला निश्चित असा फायदा मिळतो.

लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकरीवर संकट आहे, बरेच लोक बेरोजगार झाले आहेत. अशा परिस्थितीत जर आपण पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत (एमआयएस) पैसे गुंतवल्यास भविष्यात चांगला फायदा मिळवून देते.

एमआयएस ही एक छोटी बचत योजना आहे, ज्यात आपल्याला दरमहा पैसे गुंतवून पैसे कमविण्याची संधी मिळते.

या पोस्ट ऑफिस योजनेत एकरकमी गुंतवणूक करून आपल्याला दरमहा व्याज म्हणून उत्पन्न मिळते. या खात्याचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. जाणून घ्या या योजनेबद्दल सर्वकाही

या योजनेंतर्गत संयुक्त खाती उघडली जाऊ शकतात. स्वतंत्र खाते उघडताना तुम्ही या योजनेत किमान 1,000 आणि जास्तीत जास्त साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. संयुक्त खाते असल्यास जास्तीत जास्त 9 लाखांपर्यंत रक्कम जमा करता येऊ शकते. सेवानिवृत्त आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक अतिशय फायदेशीर योजना आहे.

संयुक्त खाते उघडल्यास प्रत्येक खातेधारकाला समान भागांत व्याजावरील परतावा दिला जातो. संयुक्त खाते कधीही पुन्हा एकाच खातेदाराकडे वर्ग करता येते.

तसेच स्वतंत्र खाते संयुक्त खात्यांमध्ये रुपांतरित केले जाऊ शकते. खात्यात बदल करण्यासाठी संयुक्त अर्ज द्यावा लागेल.

खाते उघडल्यानंतर आपण एका वर्षासाठी पैसे काढू शकत नाही. जर आपण एक ते तीन वर्षांच्यादरम्यान पैसे काढले तर आपल्या जमा असलेल्या रकमेवर 2% पैसे कापले जातील.

खाते उघडल्यानंतर 3 वर्षानंतर तुम्ही ठरावीक कालावधीआधीच पैसे काढल्यास त्या रकमेवर १% पैसे कापले जातात. एखाद्या विशिष्ट प्रसंगी, या योजनेत जमा केलेली रक्कम कालावधीपूर्वी काढता येऊ शकते.

आपण हे खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्‍या पोस्ट ऑफिसमध्ये बदलू शकता. मॅच्युरिटीची 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपण रक्कम पुन्हा गुंतवू शकता.

यामध्ये वारसदार व्यक्तीची नेमणूक केली जाऊ शकते, जेणेकरून दुर्घटना घडल्यास त्याला रक्कम मिळू शकेल. एमआयएस योजनेत टीडीएस कापला जात नाही, परंतु व्याजावर कर भरावा लागतो.