पोस्ट ऑफिसच्या नियमांत बदल; आता 'हे' काम पासबुकशिवाय होणार नाही By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 05:02 PM 2022-01-23T17:02:47+5:30 2022-01-23T17:10:43+5:30
Post Office Rule : तुमच्या गुंतवणुकीची मॅच्युरिटी पूर्ण झाली आहे आणि तुम्हाला ते पैसे काढून खाते बंद करायचे आहे, तर तुम्हाला पासबुक पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावे लागेल. नवी दिल्ली : पोस्ट ऑफिसच्या (Post Office) ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. पोस्ट ऑफिसने नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता तुम्हाला बहुतांश सेवांसाठी पासबुकची आवश्यकता लागणार आहे.
जर तुम्हाला RD, MIS, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, किसान विकास पत्र (KVP) किंवा राष्ट्रीय बचत योजना व्यतिरिक्त कोणतेही खाते बंद करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा पासबुक सबमिट करावे लागेल.
खाते बंद करण्यासाठी पासबुक आवश्यक तुमच्या गुंतवणुकीची मॅच्युरिटी पूर्ण झाली आहे आणि तुम्हाला ते पैसे काढून खाते बंद करायचे आहे, तर तुम्हाला पासबुक पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावे लागेल.
पोस्ट ऑफिसने नुकतेच एक परिपत्रक जारी करून नवीन नियमाची माहिती दिली आहे. तुमचे खाते बंद करताना कर्मचारी तुमच्याकडून पासबुक जमा करतील, यासाठी हा नियम आणण्यात आला होता.
पोस्ट ऑफिसकडून माहिती पोस्ट ऑफिसने एक परिपत्रक जारी करून म्हटले आहे की, 'टाईम डिपॉझिट खाते बंद करताना किंवा मुदतीपूर्वी बंद करताना, ग्राहकाला त्याचे पासबुक जमा करावे लागेल. हा नवीन नियम आरडी, टीडी, एमआयएस, एससीएसएस, केव्हीपी आणि एनएससीसाठी लागू आहे.
सर्व प्रकारच्या पोस्ट ऑफिसमध्ये, अगदी शाखा कार्यालयांमध्ये, खाते बंद झाल्यावर पासबुक जमा करावे लागेल. पासबुकमध्ये शेवटच्या व्यवहाराचा उल्लेख केल्यानंतर, त्यात क्लोजर एंट्री केली जाईल आणि पोस्ट ऑफिस कर्मचारी तारखेचा शिक्का मारतील.
खाते बंद करण्याचा अहवाल पोस्ट ऑफिस देईल तुमचे खाते बंद असल्यास पोस्ट ऑफिसमधून खातेधारकाला पोचपावती म्हणून अहवाल दिला जाईल. ही पोचपावती तुमचे खाते कायमचे बंद केले असल्याची हमी असेल.
खातेधारक हे पोचपावती पत्र NOC म्हणून ठेवू शकतात. जर नंतर खातेदाराने खाते विवरण मागितले तर त्याला पासबुक सारखा कागद दिला जाईल, ज्यासाठी ग्राहकाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.