Post Office ची लोकप्रिय योजना; एकदाच पैसे गुंतवा, महिन्याला होईल ९२५० रुपयांची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 12:49 PM2024-08-16T12:49:34+5:302024-08-16T13:00:46+5:30

Post Office Monthly Income Scheme : पोस्ट ऑफिस प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना राबवित आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि उत्तम परताव्याच्या दृष्टीनंही या योजना खूप लोकप्रिय आहेत.

पोस्ट ऑफिस (Post Office) प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना (Saving Schemes) राबवित आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि उत्तम परताव्याच्या दृष्टीनंही या योजना खूप लोकप्रिय आहेत.

गुंतवणुकीबरोबरच नियमित उत्पन्न हवं असेल तर अशा वेळी पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम (Monthly Income Scheme) म्हणजेच एमआयएस हा उत्तम पर्याय ठरू शकतो. एकरकमी गुंतवणुकीनंतर लगेचच पुढील महिन्यापासून तुमची व्याजाद्वारे कमाई सुरू होते.

पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेली माहिती पाहिली तर या योजनेत सरकारकडून ७.४ टक्के दरानं व्याज दिलं जातं. एमआयएसमध्ये तुम्हाला खातं उघडल्याच्या तारखेपासून एक महिना पूर्ण झाल्यानंतर व्याजाचा लाभ मिळण्यास सुरुवात होते, म्हणजेच गुंतवणुकीच्या पुढील महिन्यापासून नियमित उत्पन्नाची हमी दिली जाते. यामध्ये जमा रकमेवर मिळणारं व्याज दरमहा दिलं जातं.

पोस्ट ऑफिस एमआयएसमध्ये तुम्ही फक्त १,००० रुपयांच्या गुंतवणुकीने खाते उघडू शकता. यामध्ये पहिले सिंगल आणि दुसरे जॉइंट अकाऊंट अशा दोन प्रकारे खातं उघडता येतं. जास्तीत जास्त गुंतवणुकीच्या मर्यादेबद्दल बोलायचं झालं तर एक खातेदार या योजनेत जास्तीत जास्त ९ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो, तर संयुक्त खातं उघडल्यावर जास्तीत जास्त १५ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतो.

मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असणं आवश्यक आहे. १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते.

आता एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही या योजनेतून दरमहा ५००० रुपयांपेक्षा जास्त कमाई कशी करू शकता याबद्दल सांगायचं झालं तर त्यासाठी पोस्ट ऑफिस एमआयएस कॅल्क्युलेटरची मदत घ्यावी लागेल. जर तुम्ही यात ५ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर ७.४ टक्के व्याजानं तुम्हाला दरमहा ३,०८३ रुपये व्याज उत्पन्न मिळेल, तर ९ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दरमहा जास्तीत जास्त व्याज उत्पन्न ५५५० रुपये असेल. या योजनेत लॉक-इन पीरिअड ५ वर्षांचा आहे.

जर तुम्ही जॉइंट अकाउंट उघडून नियमानुसार एकरकमी १५ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला ७.४ टक्के दरानं दरमहा ९,२५० रुपयांचं उत्पन्न मिळेल. जर गुंतवणूकदाराचा मृत्यू ५ वर्षांच्या मुदतपूर्तीपूर्वी झाला तर खातं बंद केलं जातं आणि अनामत रक्कम नॉमिनी किंवा कायदेशीर वारसांना परत केली जाते. स्कीम बंद झाल्यानंतर शेवटच्या महिन्यापर्यंत व्याज दिलं जातं.

जर तुम्हाला या पोस्ट ऑफिस योजनेच्या मॅच्युरिटीपूर्वी तुमचं खातं बंद करायचं असेल तर गुंतवणुकीच्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही हे काम करू शकाल. खातं उघडण्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर आणि ३ वर्षापूर्वी बंद केल्यास गुंतवणुकीच्या रकमेतून २ टक्के इतकी रक्कम वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम दिली जाईल. खातं उघडल्याच्या तारखेपासून ३ वर्षांनंतर आणि ५ वर्षापूर्वी बंद केल्यास मुद्दलातून १ टक्के इतकी रक्कम वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम दिली जाईल.