Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 08:45 AM2024-10-02T08:45:57+5:302024-10-02T09:18:32+5:30

Post Office Investment Tips : भविष्याच्या दृष्टीनं अनेकजण आता गुंतवणूकीकडे वळू लागले आहेत. बँकेप्रमाणेच पोस्टातही गुंतवणूकीच्या अनेक स्कीम्स उपलब्ध आहेत. पाहूया तुम्ही याद्वारे कशी कमाई करू शकता.

Post Office Investment Tips : भविष्याच्या दृष्टीनं अनेकजण आता गुंतवणूकीकडे वळू लागले आहेत. बँकेप्रमाणेच पोस्टातही गुंतवणूकीच्या अनेक स्कीम्स उपलब्ध आहेत. पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम ही मासिक कमाई करणारी योजना आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अतिशय चांगली मानली जाते.

निवृत्तीनंतर जर तुमचं कोणतंही नियमित उत्पन्न नसेल तर तुम्ही या योजनेत एकरकमी रक्कम गुंतवू शकता आणि व्याजाच्या माध्यमातून स्वत:साठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. या योजनेच्या माध्यमातून सलग ५ वर्षे दरमहा ९,२५० रुपयांपर्यंत कमाई करता येते. पण जर एखाद्या व्यक्तीला ५ वर्षांनंतरही कमाई सुरू ठेवायची असेल तर त्यासाठी काही मार्ग आहे का? जाणून घ्या या योजनेशी संबंधित खास गोष्टी.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत सिंगल आणि जॉइंट अकाऊंटसाठी डिपॉझिटच्या वेगवेगळ्या मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. सिंगल खात्यात जास्तीत जास्त ९,००,००० रुपये आणि संयुक्त खात्यात जास्तीत जास्त १५,००,००० रुपये जमा केले जाऊ शकतात.

पोस्ट ऑफिस एमआयएस ७.४% व्याज देते. तुमचं उत्पन्न तुमच्या ठेवीच्या आधारे ठरवलं जातं. जर तुम्ही खात्यात ९,००,००० रुपये जमा केले तर ७.४% व्याजानुसार तुम्ही दरमहा ५,५५० रुपयांपर्यंत कमाई करू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही तुमच्या पत्नी किंवा कुटुंबातील सदस्यासोबत संयुक्त खाते उघडले आणि त्यात १५,००,००० रुपये जमा केले तर तुम्ही महिन्याला जास्तीत जास्त ९,२५० रुपये कमवू शकता.

POMIS खातं ५ वर्षांसाठी उघडलं जाऊ शकतं. तुम्ही जेवढी रक्कम जमा कराल, ती ५ वर्षांसाठी जमा राहते. त्या ठेवीवर मिळणाऱ्या व्याजातून तुम्ही ५ वर्षांसाठी कमाई करता आणि ५ वर्षांनंतर तुमची रक्कम तुम्हाला परत मिळते.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मुदतवाढीचा कोणताही नियम नाही. यामाध्यमातून तुम्हाला आणखी कमाई सुरू ठेवायची असेल तर मॅच्युरिटीनंतर रक्कम काढून नवीन खातं उघडून पुन्हा रक्कम जमा करून पुढील ५ वर्षांसाठी पुन्हा उत्पन्नाची व्यवस्था करू शकता.

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीममध्ये देशातील कोणताही नागरिक खातं उघडू शकतो. तुम्ही तुमच्या मुलाच्या नावानंही खातं उघडू शकता. मुलाचं वय १० वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याचे पालक किंवा कायदेशीर पालक त्याच्या नावानं खातं उघडू शकतात. मूल १० वर्षांचं झाल्यावर त्यांना स्वत: खातं चालवण्याचा अधिकारही मिळू शकतो. एमआयएस खात्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असणं आवश्यक आहे. ओळखपत्रासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड बंधनकारक आहे.