ATM ऐवजी OTP ची पॉवर, कॅशची गरज पूर्ण करण्यासाठी आता व्हर्च्युअल एटीएम; कशी काढाल कॅश By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 10:11 AM 2024-02-15T10:11:27+5:30 2024-02-15T10:22:36+5:30
छोट्या रकमेच्या गरजांसाठी तुम्हाला एटीएममध्ये जाण्याची गरज नाही. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ठेवण्याची देखील गरज नाही. छोट्या रकमेच्या गरजांसाठी तुम्हाला एटीएममध्ये जाण्याची गरज नाही. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ठेवण्याची देखील गरज नाही. हे काम ओटीपीच्या माध्यमातून करता येईल. आता आभासी व्हर्च्युअल एटीएम हे वास्तव बनलं आहे. वास्तविक, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या (UPI) च्या लोकप्रियतेमुळे, आजकाल बरेच लोक बाहेर जाताना रोख पैसे घेऊन जात नाहीत.
ऑनलाइन पेमेंटसाठी फक्त मोबाइल फोन आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे. या सुविधेमुळे डेबिट आणि क्रेडिट कार्ड यांची गरज काही प्रमाणात कमी होणार आहे. मात्र, अचानक रोख रकमेची गरज भासल्यास समस्या निर्माण होते. विशेषतः दुर्गम भागात प्रवास करताना ही समस्या अधिक जाणवते.
मग सर्वप्रथम तुम्हाला सुरू असलेलं एक एटीएम शोधावं लागतं. मग त्या एटीएममध्ये कॅश आहे का नाही हे पाहावं लागतं. मग काही रक्कम त्वरित काढण्यासाठी तुम्हाला तुमचे डेबिट कार्डही सोबत ठेवावं लागेल. जर शेजारच्या दुकानातून पैसे काढण्यासाठी तुमचा फोन वापरता आला असता तर बरं झालं असतं ना!
इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, फिनटेक कंपनी Paymart India ने या व्हर्च्युअल एटीएमची संकल्पना मांडली आहे. चंदीगड स्थित कंपनी याला कार्डलेस आणि हार्डवेअर लेस पैसे काढण्याची सर्व्हिस म्हणते. व्हर्च्युअल एटीएमसाठी, तुम्हाला कोणत्याही एटीएममध्ये जाण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कार्ड आणि पिन ठेवण्याची गरज नाही.
व्हर्च्युअल एटीएम छोटी अमाऊंट काढण्यासाठी प्रभावी ठरतील. तुम्हाला तुमच्या मोबाईल बँकिंग ॲपवरून पैसे काढण्याची विनंती करावी लागेल. यासाठी तुमचा फोन नंबर बँकेशी जोडलेला असला पाहिजे. हा ओटीपी तुम्हाला Paymart सोबत रजिस्टर असलेल्या दुकानाला दाखवावा लागेल. ओटीपी तपासल्यानंतर दुकानदार तुम्हाला रोख रक्कम देईल.
Paymart शी संबंधित दुकानदारांची यादी तुमच्या मोबाइल बँकिंग ॲपवर दिसेल. यासोबतच त्यांची नावं, ठिकाणं आणि फोन नंबरही दिसतील. पैसे काढण्यासाठी डेबिट कार्ड, एटीएम मशीन किंवा यूपीआयची गरज भासणार नाही. ही सेवा वापरण्यासाठी ग्राहकाकडून कोणतंही शुल्क घेतलं जाणार नाही. सध्या पैसे काढण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. ही सेवा दुर्गम भागांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
ही सेवा IDBI बँकेत ५ महिन्यांपासून यशस्वीपणे चालवली जात आहे. फिनटेक फर्मनं इंडियन बँक, जम्मू आणि काश्मीर बँक, तसंच करूर वैश्य बँकेशीही करार केला आहे. सध्या ही सेवा चंदीगड, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई आणि मुंबई येथे उपलब्ध आहे.
मार्चपासून संपूर्ण देशात त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू आहे. तसंच, CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड सोबत व्हर्च्युअल एटीएम ५ लाख ठिकाणांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.