PPF Investment : पीपीएफमध्ये पैसे गुंतवताय, पण गरजेला काढायचे असल्यास काय आहेत नियम?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 09:53 AM2023-03-05T09:53:48+5:302023-03-05T09:58:18+5:30

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) ही एक चांगली योजना आहे. यात बचतीपेक्षा जास्त व्याज मिळते.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) ही एक चांगली योजना आहे. यात बचतीपेक्षा जास्त व्याज मिळते. आता सात टक्क्यांहून अधिक व्याज मिळत आहे. यात चांगली गोष्ट ही आहे की कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिस किंवा बँकेत दरमहा ५०० रुपये जमा करून याची सुरुवात करू शकते.

पीपीएफ खात्यात दरवर्षी किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये भरता येतात. या खात्यात वर्षात १२ वेळा पैसे भरता येतात. खाते चालू ठेवायचे असेल तर वर्षातून एकदा तरी पैसे भरावे लागतात.

याला आणखी एक चांगला भाग म्हणजे, तिचा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षे आहे. तिला मध्येच बंद करणे किंवा आंशिक पैसे काढण्याबाबत काही नियम आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया...

तात्पुरते पैसे काढण्याची पद्धत काय? - जर एखाद्या व्यक्तीचे पीपीएफ खाते पाच वर्षे जुने असेल तर त्यातील ५० टक्के रक्कम काढता येते. यासाठी तुम्हाला तुमच्या खात्याच्या कागदपत्रांसह एक अर्जही संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिसला द्यावा लागेल. यानंतर पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर होतात.

अभ्यास आणि उपचारांसाठी - जर पीपीएफ पाच वर्षांचा झाला असेल आणि रक्ताच्या नात्यातील कोणी गंभीर आजारी असेल किंवा मुलाला दहावीनंतरच्या अभ्यासासाठी फीची गरज असेल तर ते बंद करूनही पैसे काढता येतील. मात्र त्यासाठी त्या संबंधीची कागदपत्रे द्यावी लागतील. उपचाराचे बिल किंवा कॉलेजच्या फीची पावती द्यावी लागेल. तुम्ही जरी परदेशात शिफ्ट होत असाल तरी तुम्ही ते बंद करू शकता.

मृत्यू झाल्यास दंड नाही - जेव्हाही पीपीएफ खाते बंद केले जाते, तेव्हा दंड भरून खाते बंद केले जाते, परंतु खातेधारकाचा मृत्यू झाल्यास, दंड आकारला जात नाही.