तोट्यातून नफ्यात आली येस बँक; 50 शाखा बंद करण्याचा निर्णय
By ravalnath.patil | Updated: October 26, 2020 19:49 IST2020-10-26T19:26:34+5:302020-10-26T19:49:37+5:30

नवी दिल्ली : येस बँकेची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारत आहे. येस बँकेने 2020-21 या आर्थिक वर्षाच्या दुसर्या तिमाहीत 129.37 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. अडकलेल्या कर्जात वाढ असूनही येस बँकेला हा फायदा झाला. वर्षभरापूर्वी याच कालावधीत बँकेचे 600 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.
येस बँकेने शेअर मार्केटमध्ये सांगितले की, आढावा कालावधीत एकूण उत्पन्न वर्षभरापूर्वीच्या 8,347.50 कोटी रुपयांहून कमी होऊन 5,952.1 कोटी रुपये झाले आहे.
मात्र, या कालावधीत बँकेचा एनपीए(NPA) वाढला आहे. बँकेची परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. याविषयी बँकेचे सीईओ प्रशांत कुमार यांनी माहिती दिली.
बँकेचे सीईओ प्रशांत कुमार म्हणाले की, "आम्ही निधी उभारणीपासून अनेक सुधारात्मक पावले उचलली आहेत. दुसऱ्या तिमाहीत परिणाम चांगले दिसून आले आहे. बँक आता रिकव्हरी मोडमध्ये आहे आणि मी या प्रगतीवर समाधानी आहे."
जवळपास 7 महिन्यांपूर्वी जेव्हा प्रशांत कुमार यांनी येस बँकेची जबाबदारी स्वीकारली. तेव्हा बँकेला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला.
प्रशांत कुमार म्हणाले की, बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी येस बँक आपल्या 50 शाखा बंद करणार आहे. कारण, बर्याच शाखा या एकमेकांपासून जवळच्या अंतरावर आहे. ज्याची आवश्यक नाही.
दरम्यान, नवीन व्यवस्थापनाखाली खासगी क्षेत्रातील या बँकने चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये चालू खर्चात (Operational Expenses) 20 टक्के कपात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
यासाठी बँक भाडेपट्टीवर घेतलेल्या अनावश्यक जागा परत करत आहे. याव्यतिरिक्त बँक सर्व 1100 शाखांसाठी नव्या भाडेतत्वासाठी चर्चा करत आहे.
याचबरोबर, एटीएमची संख्याही कमी करण्याची शक्यता आहे. बँकेची भांडवल वाढवण्यासाठी मार्च 2021 पर्यंत 2 लाख कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे प्रशांत कुमार म्हणाले.