पैशांची अडचण आहे? असा जमवा निधी...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 10:05 AM2022-06-05T10:05:36+5:302022-06-05T10:39:36+5:30

- चंद्रकांत दडस (उपसंपादक, मुंबई) : अचानक नोकरी जाणे, भांडवल बाजारातील नुकसान आणि वैद्यकीय उपचार यासारख्या आणीबाणीच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येकाने आपत्कालीन निधी ठेवला पाहिजे. नेमके काय करावे जाणून घेऊ...

सामान्य माणसाच्या आयुष्यात पैशांची कधीही अडचण येऊ शकते. त्यामुळे त्यासाठी आगाऊ तयारी करणे फार महत्त्वाचे आहे. अचानक नोकरी जाणे, भांडवल बाजारातील नुकसान आणि वैद्यकीय उपचार यासारख्या आणीबाणीच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येकाने आपत्कालीन निधी ठेवला पाहिजे. नेमके काय करावे जाणून घेऊ...

आपत्कालीन निधीचा अर्थ अशा ठिकाणी पैसे गुंतविणे आहे, जिथे जास्त काळ पैसे ठेवण्याची अट नसावी. दुसरे, आवश्यकतेनुसार पैसे काढता यायला हवेत. प्रत्येक व्यक्तीने त्याच्या आर्थिक क्षमतेच्या आधारे आपत्कालीन निधी तयार करण्याचा विचार केला पाहिजे. आर्बिट्राज फंड, ओव्हरनाईट फंड, शॉर्ट टर्म बँक एफडी यासोबत काही रोख रक्कम बँकेत ठेवण्याचा पर्याय उत्तम आहे. सध्या डेट फंडपासून शक्यतो दूर राहावे.

आजच्या काळात आपत्कालीन निधी खूप महत्त्वाचा आहे. हे केवळ आपत्कालीन परिस्थितीसाठीच नाही, तर ते घेतल्याने तुमचा आत्मविश्वासही कायम राहतो. इमर्जन्सी फंड असल्याने तुम्ही तणावमुक्त राहू शकता. बाजारातील परिस्थितीच्या आधारावर, सल्लागाराशी सल्लामसलत केल्यानंतर, आपत्कालीन निधी तयार केला पाहिजे.

हा एक डेट फंड आहे, जो एका दिवसात मॅच्युअर होणाऱ्या बाँड्समध्ये गुंतवणूक करतो. बॉण्ड्स प्रत्येक ट्रेडिंग दिवसाच्या सुरुवातीला खरेदी केले जातात, जे पुढील ट्रेडिंग दिवशी मॅच्युअर होतात. सुरक्षित परतावा मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी ओव्हरनाईट फंड हा एक चांगला पर्याय आहे, जेथे मॅच्युरिटी १ दिवसाची असते. १ दिवसाच्या मॅच्युरिटीसह, १०० टक्के रक्कम कर्ज बाजारात गुंतविल्यामुळे येथे जोखीम कमी होते. मात्र, १ दिवसाच्या मॅच्युरिटीमुळे त्यात परतावा काहीसा कमी आहे.

अनेक बँका १ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी एफडी करण्याचा पर्याय देखील देतात. बहुतेक बँकांमध्ये किमान एफडी १ हजार रुपयांपासून सुरू होते. जास्तीत जास्त रक्कम काहीही असू शकते.

पोस्ट ऑफिसमध्ये आरडीवर वार्षिक ५.८ टक्के व्याज मिळत आहे. त्याचबरोबर विविध बँकांमध्ये ५ ते ६ टक्के व्याज मिळत आहे. १ वर्षापर्यंतच्या कालावधीसह आरडी १० वर्षांपर्यंत वाढवता येतात.