PTC India Share: ‘या’ सरकारी कंपनीतील हिस्सा खरेदी करण्यासाठी टाटा, जिंदाल शर्यतीत; शेअरनं पकडला रॉकेट स्पीड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 04:06 PM2023-03-02T16:06:52+5:302023-03-02T16:12:35+5:30

PTC India Share: कंपनीच्या शेअरमध्ये सलग चौथ्या दिवशी अपर सर्किट लागलं आहे. शेअर खरेदीसाठी लोकं पडली तुटून.

देशातील पॉवर ट्रेडिंग कंपनी पीटीसी इंडिया लिमिटेडच्या ​​ (PTC India Ltd) शेअरमध्ये सलग चौथ्या दिवशी अपर सर्किट लागलं आहे. बुधवारनंतर, गुरुवारीही कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांची वाढ झालीये.

पीटीसी इंडियाचे शेअर्स ५ टक्क्यांनी वाढून ९६.५७ रुपयांवर ट्रेड करत होते. शेअर्सच्या या तेजीमागे मोठं कारण आहे. खरं तर, अशी बातमी आहे की टाटा समूहासह अनेक कंपन्यांनी पीटीसी इंडियामधील स्टेकसाठी बोली लावण्यात स्वारस्य दाखवले आहे.

इकॉनॉमिक टाइम्सने सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, टाटा पॉवर, जेएसडब्ल्यू एनर्जी, ग्रीनको आणि टोरेंट ग्रुपनं पीटीसी इंडियामधील कंट्रोलिंग स्टेक खरेदी करण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) सादर केले आहे. तर अदानी समूहाने बोली लावलेली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूहानं ईओआय सादर केलेला नाही. हिंडेनबर्ग वादानंतर, देशातील पॉवर ट्रेडिंग कंपनीने PTC इंडियामधील स्टेकसाठी बोली लावण्यापासून स्वतःला दूर केलं होतं.

NTPC लिमिटेड, NHPC लिमिटेड, पॉवर ग्रिड कॉर्प ऑफ इंडिया आणि पॉवर फायनान्स कॉर्प पीटीसी इंडियामधील हिस्सा विकत आहेत. या सर्व कंपन्यांनी अनुक्रमे ४ टक्के म्हणजेच एकूण १६ टक्के हिस्सा विकण्याची योजना आखली आहे.

बुधवारी, आठवड्याच्या चौथ्या ट्रेडिंग दिवशी, पीटीसी इंडियाच्या शेअर्सने ५ टक्क्यांपर्यंत झेप घेतली आणि कंपनीचे शेअर्स ९६.५७ रुपयांची किंमतीवर पोहोचले. २४ जानेवारी रोजी शेअरनं ५२ आठवड्यांची ११७.५० रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. गेल्या पाच ट्रेडिंग सेशन्समध्ये स्टॉक ७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.