मोठ्या पगाराची नोकरी सोडली, घर विकून सुरू केलं समोस्याचं दुकान; आता दररोज कमावतोय १२ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 10:11 AM2023-12-29T10:11:36+5:302023-12-29T10:22:17+5:30

जोडप्यानं आपल्या मोठ्या मेहनतीच्या जोरावर समोस्यातून कोट्यवधींचा व्यवसाय उभा केला आहे.

आजकाल देशातील बहुतांश तरुण स्टार्टअपच्या दिशेनं वळत आहेत. पण काही स्टार्टअप्स जितक्या वेगानं उघडतात तितक्याच वेगानं बंद होत आहेत. पण जर एखाद्याला आपल्या बिझनेस आयडियावर पूर्ण विश्वास असेल आणि त्यासाठी मेहनत करण्याची तयारी असेल तर स्टार्टअप नक्कीच यशस्वी होऊ शकतो.

समोसा सिंगचे संस्थापक शिखर वीर सिंग आणि निधी सिंग यांनीही असंच काहीसं केलं. त्यांनी त्यांच्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडल्या आणि स्वतःच्या स्टार्टअपवर काम करण्यास सुरुवात केली. पण हे सर्व इतकं सोपं नव्हतं. दोघांनाही सुरुवातीला खूप अडचणींचा सामना करावा लागला.

त्यांना घरही विकावं लागलं. एवढं करूनही ते आपल्या कल्पनेवर ठाम राहिले. त्याचाच परिणाम म्हणजे आज या व्यवसायातून ते दररोज लाखो रुपयांची कमाई करत आहे. त्यांनी एवढं मोठं यश कसं मिळवलं ते आपण जाणून घेऊ.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, समोसा सिंगचे संस्थापक शिखर वीर सिंह आणि निधी सिंह आहेत. निधी आणि शिखर यांची पहिली भेट कुरुक्षेत्र विद्यापीठात बी.टेक दरम्यान झाली होती. या दोघांनी हरियाणातील एका इंजिनिअरिंग कॉलेजमधून बायोटेक्नॉलॉजीमध्ये बीटेक केलंय. यानंतर निधी यांनी गुरुग्राममधील एका कॉर्पोरेट हाऊसमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

नंतर शिखर वीर सिंग यांनी हैदराबादच्या इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ सायन्सेसमधून एम.टेक.चं शिक्षण घेतलं. २०१५ मध्ये दोघांनी व्यवसाय करण्याचा विचार केला. यादरम्यान दोघांनीही नोकरी सोडली.

यावेळी शिखर वीर सिंग हे बायोकॉनमध्ये प्रिन्सिपल सायंटिस्ट होते आणि निधी यांचा पगार वार्षिक ३० लाख रुपये होता. एक वर्षानंतर, २०१६ मध्ये, त्यांनी बंगळुरूमध्ये आपल्या बचतीतून समोसा सिंग नावाचं स्टार्टअप सुरू केला.

समोसा सिंग सुरू झालं, पण लवकरच त्यांना मोठ्या किचनची गरज भासू लागली. यासाठी दाम्पत्याला ८० लाख रुपयांना त्यांची घर विकावं लागलं. त्यांना मोठ्या ऑर्डरसाठी पैशांची गरज होती. त्यासाठी त्यांनी फ्लॅट विकणं योग्य मानलं. या पैशातून दोघांनी बेंगळुरू येथे भाड्यानं फॅक्ट्री घेतला. व्यवसाय वाढवण्यासाठी फ्लॅट विकून भाड्यानं फॅक्ट्री घेण्याचा निर्णय अगदी योग्य होता. त्यामुळे व्यवसाय अनेक पटींनी वाढला.

समोसा सिंग सुरू करताना दोघांनाही अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. पण दोघांची मेहनत फळाला आली. काही दिवस आणि महिन्यांतच त्यांच्या व्यवसाय झपाट्यानं वाढू लागल्या. आज ते दर महिन्याला सुमारे ३० हजार समोसे विकतात. त्यांची वार्षिक उलाढाल ४५ कोटी रुपये आहे. रिपोर्टनुसार, पती-पत्नी दोघे मिळून दररोज जवळरास १२ लाख रुपये कमवत आहेत.