एक कोटींची नोकरी सोडली, सुरू केला व्यवसाय; शुगर कॅास्मेटिक्सला बनवली ५०० कोटींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 08:50 AM2023-10-17T08:50:47+5:302023-10-17T08:59:08+5:30

असं म्हणतात की तुम्ही तुमच्या अपयशातून शिकलात तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

असं म्हणतात की अपयश ही यशाची पायरी आहे. तुम्ही तुमच्या अपयशातून शिकलात तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. शार्क टँक (Shark Tank India) या टीव्ही शोच्या जज विनिता सिंग यांनीही असंच काहीसं केलंय. दोन स्टार्टअप्सचं अपयश त्यांना खूप काही शिकवून गेलं. यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी शुगर कॉस्मेटिक्सचा (Sugar Cosmetics) पाया रचला.

आज कंपनीची १३० हून अधिक शहरांमध्ये अडीच हजारांहून अधिक आउटलेट्स आहेत. कंपनीच्या आउटलेटची संख्या सतत वाढत आहे. शुगर कॉस्मेटिक्स हा एक असा भारतीय ब्रँड आहे जो अल्पावधीतच महिलांमध्ये लोकप्रिय झाला आहे. केवळ ७ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या कंपनीला मोठं यश मिळालंय.

विनीता सिंग यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. बिझनेस जगतात ते एक प्रसिद्ध नाव आहे. आज त्यांच्या कंपनीची उलाढाल ५०० कोटींहून अधिक आहे. तब्बल १० वर्षांचा हा यशाचा प्रवास त्यांनी पार केला आहे.

लहानपणापासूनच अभ्यासात त्या चांगल्या होत्या. त्यांचा जन्म १९८३ मध्ये गुजरातमधील आणंद येथे झाला. आई पीएचडी आणि वडील AIIMS मध्ये बायोफिजिस्ट. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल, आरके पुरम येथून केलं.

विनीता यांनी आयआयटी आणि आयआयएममधून शिक्षण घेतलंय. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्यांना एका इन्व्हेस्टमेंट बँकेत १ कोटी रुपयांच्या नोकरीची ऑफर देण्यात आली होती.

पण, त्यांनी ती नाकारली आणि स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. व्यवसायाच्या वाटेवरचा त्यांचा प्रवास अत्यंत खडतर होता. कोणत्याही उद्योजकाला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांनाही विनीता यांनी तोंड दिलं. पण, प्रत्येक अडचणीवर त्यांनी मात केली.

विनीता यांनी २०१५ मध्ये शुगर कॉस्मेटिक्स सुरू केलं. विनीता यांच्या मते, महिलांनी विंग्ड आयलायनर खरेदी करण्यापूर्वी ते कसं वापरावं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे, असं त्यांचं मत आहे.

टीमनं ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी YouTube, Instagram आणि शुगरच्या स्वतःच्या अॅप्सचा वापर केला. ज्या ठिकाणी ग्राहक सर्वाधिक खरेदी करतात त्या ठिताणी उपस्थित राहण्याचं त्यांनी ठरवलं. मग ते स्थानिक स्टोअर असो, शॉपर्स स्टॉप किंवा नायका. विनीता सिंग (Vineeta Singh) आणि त्यांचे पती कौशिक मुखर्जी यांनी शुगर कॉस्मेटिक्सची सुरुवात केली आहे.