नोकरी थांबवताय? आधी 'या' महत्वाच्या गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा येऊ शकते पश्चात्तापाची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 03:34 PM2022-11-26T15:34:42+5:302022-11-26T15:39:36+5:30

व्हीआरएस घेतल्यानंतर अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आपले नियोजन नीट नसेल तर पश्चात्तापाची वेळ येऊ शकते.

नवी दिल्ली : अलीकडच्या काळात अनेकांचा व्हीआरस अर्थात स्वेच्छानिवृत्ती घेण्याकडे वाढता कल दिसून येत आहे. तुम्ही व्हीआरएस घेण्याचा विचार करीत असाल, तर आधी आपल्या भविष्याचे नीट नियोजन करणे खूप आवश्यक आहे; कारण व्हीआरएस घेतल्यानंतर अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आपले नियोजन नीट नसेल तर पश्चात्तापाची वेळ येऊ शकते. व्हीआरएस घेण्यासाठी तीन महिने आधी नोटीस द्यावी लागते. तर जर जाणून घ्या, कोणत्या गोष्टींची घ्यायला हवी काळजी.

आपल्याला काय मिळेल हे समजून घ्या - उरलेल्या सेवाकाळासाठी मागील १८ महिन्यांतील वेतनाच्या ५० टक्के हिशेबाने रक्कम व्हीआरएस घेताना मिळते. उदा. तुम्हाला १ लाख रुपये वेतन असेल आणि ५ वर्षांची सेवा शिल्लक असेल, तर तुम्हाला ३० लाख रुपये मिळतील. याशिवाय ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि पीएफही मिळेल. काही कंपन्या मेडिकल कव्हरही देतात. जाणकारांच्या मते तुमची सेवा ५ अथवा ३ वर्षेच उरली असेल, तर ती पूर्ण करून रीतसर निवृत्ती घेणे परवडते.

भविष्याचे नियोजन करा - व्हीआरएसनंतर तुमचे उत्पन्न बंद होऊ शकते. त्यामुळे भविष्याच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी नवी नोकरी किंवा व्यवसाय सुरू करा.

आपत्कालीन निधी जमा करा - व्हीआरएस घेतल्यानंतर लगेच नोकरी मिळेल, असे होत नाही. व्यवसायातही स्थिर व्हायला वेळ लागतो. त्यामुळे किमान १२ महिने आवश्यक गरजा भागतील एवढा आपत्कालीन निधी तुमच्याकडे तयार हवा.

मिळालेली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवा - व्हीआरएसच्या वेळी विविध लाभांतून जी रक्कम तुम्हाला मिळणार आहे, तिची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. त्यातून तुमचे भविष्य सुरक्षित होईल. एसआयपी, नॅशनल पेन्शन स्कीम, सिनिअर सिटीझन सेव्हिंग्ज स्कीम, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट, बँक एफडी यांसारख्या योजना गुंतवणुकीसाठी चांगल्या ठरू शकतात.