Quitting without serving notice period You may have to pay GST on salary
नोकरी सोडणंदेखील महागणार; पगारावर जीएसटी भरण्याची तयारी ठेवा By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 01:49 PM2021-12-06T13:49:06+5:302021-12-06T13:57:35+5:30Join usJoin usNext पगारावर जीएसटी भरावा लागण्याची शक्यता; कर्मचाऱ्यांच्या खिशाला लागू शकते कात्री एखादा कर्मचारी उत्तम संधी मिळाल्यावर नव्या कंपनीत रुजू होतो. त्याआधी तो कार्यरत असलेल्या कंपनीला नोटीस पीरियड देतो. काही जण नोटिस पीरियड न देताच दुसऱ्या कंपनीत रुजू होतात. तर काही जण नोटिस पीरियड पूर्ण करत नाहीत. अशा व्यक्तींना मोठा आर्थिक झटका बसण्याची शक्यता आहे. कोरोनाची दुसरी लाट गेल्यानंतर अनेक कंपन्यांनी भरती प्रक्रिया सुरू केली. कार्यक्षम कर्मचारी हवेत यासाठी कंपन्यांची घाई सुरू आहे. त्यासाठी अनेक कंपन्या नोटिस पीरियड पूर्ण होण्याआधीच रुजू करून घेत आहेत. अशा कर्मचाऱ्यांना लवकरच आर्थिक फटका बसू शकतो. आवश्यक नोटिस पीरियड पूर्ण न करता दुसऱ्या कंपनीत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना १८ टक्के वस्तू आणि सेवा कर भरण्यासाठी तयार राहावं लागणार आहे. त्यामुळे नव्या नोकरीच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. भारत पेट्रोलियमची सहाय्यक कंपनी भारत ओमाण रिफायनरीच्या प्रकरणात केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क प्राधिकरणानं नुकताच एक महत्त्वाचा निर्णय दिला. त्यानुसार विविध कर्मचाऱ्यांवर वस्तू आणि सेवा कर लागू होईल. यामध्ये कंपन्या भरत असलेल्या टेलिफोन बिल, कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या ग्रुप इन्शुरन्स, नोटिस पीरियडच्या बदल्यात दिल्या जात असलेल्या वेतनाचा समावेश आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क प्राधिकरणानं दिलेल्या निर्णयानुसार, नोटिस पीरियड प्रकरणात कंपनी एका कर्मचाऱ्याला सेवा देत आहे. त्यामुळे त्यावर जीएसटी लागू करायला हवा. सेवा म्हणून पुरवल्या जाणाऱ्या गोष्टींवर जीएसटी लागू होतो. एखादा कर्मचारी तो कार्यरत असलेल्या कंपनीला नोटिस पीरियड न देता त्याबदल्यात पैसे देण्यास तयार होतो, तेव्हा ती सेवा समजली जाते. या स्थितीत त्या कर्मचाऱ्याला रकमेच्या १८ टक्के जीएसटी भरावा लागेल, असं कर आणि गुंतवणूक तज्ज्ञ बलवंत सिंह यांनी सांगितलं. कर्मचारी नोंदणीकृत जीएसटी भरणारा व्यक्ती नाही. त्यामुळे अशा कर्मचाऱ्याकडून ती रक्कम वसूल करून जीएसटी भरण्याची जबाबदारी कंपनीची असेल, अशी माहिती सिंह यांनी दिली. बऱ्याचशा कंपन्यांमध्ये १ ते ३ महिन्यांचा नोटिस पीरियड असतो. मात्र अनेकदा कंपन्या कर्मचाऱ्यांना लवकर रुजू होण्यास सांगतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पूर्ण नोटिस पीरियड सर्व्ह करता येत नाही. अशा स्थितीत नवी कंपनी कर्मचाऱ्याच्या सध्याच्या कंपनीचं होणारं नुकसान भरून देते.