नोकरी सोडताय का? मग करू नका 'या' चुका!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 05:38 PM2024-01-06T17:38:37+5:302024-01-06T17:53:59+5:30

नव्या वर्षात अनेकांना नव्या नोकरीचे वेध लागलेले असतात.

नव्या वर्षात अनेकांना नव्या नोकरीचे वेध लागलेले असतात. आणखी चांगली संधी आणि प्रगतीसाठी पूरक ठरेल, अशी नोकरी शोधण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. त्यासाठी अनेक जण वाढीव कौशल्यांसाठी पार्टटाइम कोर्सही करीत असतात. परंतु नवीन नोकरीच्या ठिकाणी रुजू होण्याआधी आणि जुन्या कार्यालयात राजीनामा देण्याआधी काही बाबीची लक्षपूर्वक पूर्तता करावी लागते. तसे न केल्यास मोठे नुकसान तरी होऊ शकते तसेच मनस्तापाला सामोरे जावे लागू शकते.

कोणत्याही नोकरदाराकडून भविष्यासाठी केली जाणारी महत्त्वाची गंतवणूक म्हणजे त्यांचा भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ, नव्या नोकरीच्या ठिकाणीही तो दिला जातो. त्यामुळे सध्याचे पीएफ खाते नव्या ठिकाणी ट्रान्सफर करून घ्यावे लागते. ही प्रक्रिया खूप किचकट असली तरी ईपीएफओ पोर्टलवर याची पूर्तता करता येते. कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधाही इथे दिलेली असते.

प्रत्येक कंपनी कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटी, राष्ट्रीय सण, सणासुदीच्या सुट्या, आजारपणासह काही पगारी सुट्टया देत असतात, कंपनीच्या धोरणांनुसार त्यांच्या संख्येत बदल होत असतो. वर्षभरात यातील सर्वच सुट्टया घेता येत नाहीत. नोकरी सोडण्यापूर्वी नेमकी किती सुट्या शिल्लक आहेत याचा आढावा घ्या. शिल्लक सुट्टयांचा मोबदला घ्यायला विसरू नका.

नोकरी सोडण्याआधी कंपनीने काढलेली तुमची किवा संपूर्ण कुटुंबाची आरोग्य विमा पॉलिसी व्यक्तिगत आरोग्य विमा पॉलिसीमध्ये बदलून घ्या. अनेकांना असा बदल करता येतो याची माहिती नसते. आरोग्य विमा अधिनियम २०१६ नुसार कंपनीकडून काढलेली आरोग्य विमा पॉलिसी व्यक्तीच्या नावे बदलून घेता येते.

ग्रॅच्युइटी पेमेंट अधिनियम १९७१ च्या कलम ४(१) नुसार कमीत कमी पाच वर्षांची सलग सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्याला नोकरीच्या समाप्तीनंतर कंपनीला ग्रॅच्युइटी घ्यावी लागते. सेवापूर्ततेनंतर राजीनामा दिला, सेवानिवृत्ती घेतली किंवा मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास ही रक्कम कंपनीला द्यावी लागते.