Railway Concession Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांसाठी खूशखबर, रेल्वे भाड्यात पुन्हा सवलत देण्याच्या तयारीत सरकार By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 08:26 AM 2022-08-10T08:26:36+5:30 2022-08-10T08:32:31+5:30
कोविडपूर्वी ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सवलतींचा आढावा घेण्यात यावा आणि किमान स्लीपर, एसी-३ मध्ये तत्काळ सवलती देण्याचा विचार व्हावा, अशी समितीचं म्हणणं आहे. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात सवलत देण्याची तयारी सुरू आहे. संसदीय स्थायी समितीने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या एसी-३ आणि स्लीपर क्लासच्या भाड्यात सवलत देण्याबाबत विचार करण्याची सूचना केली आहे. सुमारे अडीच वर्षांपूर्वी कोविड महासाथीदरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या विविध श्रेणींमध्ये रद्द करण्यात आलेल्या सवलतींचा पुन्हा आढावा घेण्यात यावा, असे समितीने म्हटले आहे.
रेल्वे संबंधी संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष राधामोहन सिंग यांनी अलीकडेच संसदेत सादर केलेल्या अहवालात याचा उल्लेख केला आहे. समितीने म्हटले आहे की, महासाथ आणि कोविड प्रोटोकॉल लक्षात घेता, रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना विविध श्रेणींमध्ये दिलेल्या सवलती बंद केल्या आहेत. यामध्ये 58 वर्षांवरील महिलांना 50 टक्के आणि 60 वर्षांवरील पुरुषांना 40 टक्के सवलत देण्यात येत होती.
समितीने म्हटले आहे की रेल्वे आता सामान्य स्थितीकडे वाटचाल करत आहे, त्यामुळे त्यांनी विविध श्रेणींमध्ये दिलेल्या सवलतींचा विवेकपूर्ण विचार केला पाहिजे. कोविडपूर्वी ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सवलतींचा आढावा घेण्यात यावा आणि किमान स्लीपर, एसी-३ मध्ये तत्काळ सवलती देण्याचा विचार व्हावा, अशी समितीची इच्छा आहे. कोरोना महासाथीपूर्वी रेल्वे ५४ श्रेणींमध्ये सवलत देत होती.
दिव्यांग व्यक्तींच्या चार श्रेणी रुग्ण आणि विद्यार्थ्यासह एकूण 11 श्रेणींमध्ये सवलत सुरू करण्यात आली आहे, परंतु सध्या ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्याचा कोणताही विचार नाही, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. रेल्वे 50 पेक्षा अधिक श्रेणींमध्ये 10 ते 100 टक्क्यांपर्यंत रेल्वे भाड्यात सवलत देते.
रेल्वे पंतप्रधान-राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, कलाकार, विधवा, विद्यार्थी, मूकबधिर, अंध, अपंग, मानसिक रुग्ण, अपंग प्रवासी, खेळाडू, कलाकार, चित्रपट तंत्रज्ञ, पोलीस, लष्कर, दहशतवादाशी लढताना शहीद झालेल्या निमलष्करी जवानांच्या पत्नींना सवलत होती. रेल्वेद्वारे निरनिराळ्या श्रेणीत देण्यात येणाऱ्या सवलतीत ८० टक्के लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळतो.
चौफेर टीका झाल्यानंतर रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना सवलती देण्याचा विचार करत आहे. या सवलती फक्त सामान्य आणि शयनयान श्रेणीसाठी असतील, असे यापूर्वी सूत्रांनी सांगितले होते. वयाच्या निकषांत बदल करुन प्रवास भाडे सवलत ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाईल. आधी ही वयोमर्यादा महिलांसाठी ५८ वर्षे आणि पुरुषांसाठी ६० वर्षे होती.
सूत्रांनी संकेत दिलेत की, यामागचे मुख्य कारण ज्येष्ठांसाठी सबसिडी कायम राखत या सवलतीमुळे रेल्वेवर पडणाऱ्या आर्थिक बोजाचे समायोजन करणे होय. या सवलतींमुळे ज्येष्ठांना मदत होते, हे आम्ही समजून आहोत. सवलती पूर्णत: रद्द केल्या जातील, असे आम्ही कधीही म्हटलेले नव्हते. याबाबत आम्ही आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असे एका सूत्रांनी सांगितले होते. दरम्यान, आता रेल्वे काय निर्णय घेतेय हे पाहावं लागेल.