रेल्वे स्थानकांवरही सुरू होणार एक्झिक्युटिव्ह लाउंज, फक्त दोन रुपयांत मिळू शकते एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 11:10 AM2024-09-19T11:10:27+5:302024-09-19T11:25:11+5:30

विमानतळाप्रमाणे रेल्वे स्थानकांवरही क्रेडिट कार्डवर एन्ट्रीची सुविधा दिली जाईल का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

नवी दिल्ली : देशात रेल्वेने रोज लाखो लोक प्रवास करतात. त्यामुळं प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी भारतीय रेल्वे सातत्यानं प्रयत्न करत आहे. स्थानकांपासून ते चांगल्या गाड्यांपर्यंत सर्वत्र हा प्रयत्न सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर राहण्यासाठी एक्झिक्युटिव्ह लाउंजची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

नुकतीच उत्तर प्रदेशातील प्रयागराज स्टेशनवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. याठिकाणी थांबण्यासाठी शुल्क भरावं लागत असलं तरी विमानतळाप्रमाणे रेल्वे स्थानकांवरही क्रेडिट कार्डवर एन्ट्रीची सुविधा दिली जाईल का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

दरम्यान, रेल्वे मंत्रालय देशभरातील १३३४ लहान-मोठ्या स्थानकांचा पुनर्विकास करत आहे. यातील अनेक स्थानकं विमानतळांसारखी बांधली जात आहेत. या स्थानकांमध्ये एक्झिक्युटिव्ह लाउंजही तयार करण्यात येत आहेत.

याठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी आरामदायी सोफे आणि चार्जिंग पॉइंट बसवण्यात येत आहेत. प्रवासी निर्धारित शुल्क भरून एक्झिक्युटिव्ह लाउंजचा वापर करू शकतात. याशिवाय, एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये प्रवासी नाश्ता, जेवण, पाणी, चहा, कॉफी आणि पॅक केलेल्या वस्तू खरेदी करू शकतात.

याचबरोबर, येथे वर्तमानपत्रे आणि औषधेही मिळतील. सध्या देशातील सर्व विमानतळांवर लाउंज आहेत. यामध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही दोन तास थांबू शकता. याठिकाणी तुम्ही बसून आराम करू शकता. खाण्यापिण्यासाठी बुफे देखील असतात.

या सुविधेसाठी १००० रुपयांपेक्षा जास्त शुल्क भरावे लागेल. पण अनेक बँकांच्या क्रेडिट कार्डद्वारे तुम्हाला फक्त दोन रुपयांत एंट्री मिळू शकते आणि तुम्ही आत जाऊन तुमच्या मनाप्रमाणे काहीही खाऊ शकता.

रेल्वे मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, लाउंजचे आउटसोर्सिंग करण्यात आलं आहे. संबंधित कंपन्यांना अशा ऑफर्स देण्याच्या सूचना दिल्या जातील. कारण, विमानतळावरील एंट्री इतकी महाग असते, तरीही क्रेडिट कार्ड्समुळं जवळजवळ एंट्री फ्री होते. त्यामुळं रेल्ले स्थानकांवरही हे शक्य आहे. जेणेकरून अधिकाधिक प्रवाशांना त्याचा लाभ घेता येईल.