Akasa Air: झुनझुनवालांची अकासा! पायलट, क्रू मेंबर्सना एवढी पगारवाढ की, अख्खी इंडस्ट्री हलली... By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 11:08 AM 2022-09-12T11:08:53+5:30 2022-09-12T11:13:07+5:30
कोरोना व्हायरसनंतर एअरलाईन इंडस्ट्रीला धक्क्यातून सावरायचे आहे. अशाचवेळी अकासाने व्यवसाय सुरु केला, त्या आव्हानाला तोंड देण्याची इतर कंपन्या तयारी करत होत्या... भारतीय हवाई क्षेत्रात आता आणखी एक नवीन एअरलाईन आपले पंख विस्तारत आहे. बिगबुल राकेश झुनझुनवालांचे नुकतेच निधन झाले, परंतू त्यांची कंपनी अकासा एअरलाईनने अन्य कंपन्यांना आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. अकासा एअर ही सर्वात कमी तिकीट दरांसाठी चर्चेत आहे. असे असताना अकासाने अख्ख्या एअरलाईन इंडस्ट्रीला दणाणून सोडले आहे.
अकासा एअरने गेल्या महिन्यात ७ ऑगस्टपासून विमानउड्डाण सुरु केले. कोरोना व्हायरसनंतर एअरलाईन इंडस्ट्रीला धक्क्यातून सावरायचे आहे. अशाचवेळी अकासाने व्यवसाय सुरु केल्याने आधीपासूनच बाजारात असलेल्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. अकासाकडे नवीन एअरक्राफ्ट, क्युरेटेड मेन्यू आणि नव्या पोशाखातील केबिन क्रू आहे. गो इंडिगो सध्याच्या भारतीय एअरलाईन इंडस्ट्रीमधील सर्वात स्वस्त विमान प्रवास देणारी कंपनी होती. मात्र, अकासाने त्याहूनही कमी दरात तिकिटे उपलब्ध केली आहेत.
यातच अकासाने आपल्या पायलटांचा पगार एवढा वाढविला की आजपर्यंत कोणत्याच एअरलाईनने हे धाडस केले नव्हते. तसेच अकासा येत्या काळात कर्मचाऱ्यांची भरती देखील करणार आहे. ईटीने दिलेल्या वृत्तामध्ये अकासा एअरने पायलटांच्या पगारात सरासरी ६० टक्के वाढ केली आहे. दुसरीकडे अन्य एअरलाईन कर्मचाऱ्यांची पगार कपात करत आहेत. यामुळे आता या कंपन्यांमध्ये तहलका माजणार आहे. कर्मचारी सोडून अकासामध्ये जाण्याची शक्यता आहे.
१ ऑक्टोबरपासून अकासामध्ये कॅप्टनचा पगार महिना साडेचार लाख रुपयांपासून सुर होणार आहे. तर फर्स्ट ऑफिसरचा पगार १.८ लाखांपासून सुरु होणार आहे. सध्या हा पगार अनुक्रमे २.७९ लाख रुपये आणि १.११ लाख रुपये आहे. स्पेशलायझेशन आणि फ्लाइटच्या वेळेनुसार पगार आणखी वाढू शकतो. कॅप्टन आठ लाखांपर्यंत पगार घेऊ शकतो. सध्याच्या पगारानुसार ही वाढ २८ टक्के जास्त आहे. आकासाचे सॅलरी पॅकेज इतर विमान कंपन्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे. इंडिगोपेक्षा 8 ते 10 टक्के जास्त पगार दिला जात आहे.
कंपनीच्या प्रस्तावित विस्तारानुसार पायलट आणि क्रूंची भरती केली जाणार आहे. एअरलाइनकडे सध्या 4 बोईंग 737 MAX आहेत आणि मार्च 2023 पर्यंत आणखी 18 विमाने येणार आहेत. एका विमान कंपनीला सामान्यत: राखीव जागेसह प्रति विमान १२ पायलट हवे असतात. यामुळे सध्याच्या विमानांच्या संख्येनुसार अकासाला ४८ पायलटांची आवश्यकता आहे. यापैकी बरीच पदे रिक्त आहेत. ती लवकरच भरली जातील असे अकासाची मॅनेजमेंट पाहणाऱ्या सूत्राने सांगितले आहे.