Rakesh Jhunjhunwala: १ दिवसांत तोटा भरुन निघाला! TATA च्या शेअरमुळे राकेश झुनझुनवालांना ७२० कोटींचा नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 12:28 PM2022-06-01T12:28:06+5:302022-06-01T12:33:59+5:30

मे महिन्यात नुकसान सोसावे लागले असले, तरी जूनच्या सुरुवातीलाच टाटाच्या शेअरमुळे राकेश झुनझुनवालांना फायदा झाला आहे.

आताच्या घडीला देशासह जगभरातील अनेक घटनांचे प्रतिकूल पडसाद भारतातील शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत. शेअर बाजाराचे बिग बूल अशी ओळख असलेल्या Rakesh Jhunjhunwala यांनाही बाजारातील पडझडीचा मोठा फटका बसला आहे. मे महिन्यात तब्बल १४०० कोटींचे नुकसान राकेश झुनझुनवाला यांना सोसावे लागले आहे.

मात्र, जून महिन्याची सुरुवात Rakesh Jhunjhunwala यांच्यासाठी दमदार ठरली. TATA समूहाच्या एका शेअरमुळे राकेश झुनझुनवाला यांना तब्बल ७२० कोटी रुपयांचा फायदा झाल्याचे सांगितले जात आहे.

TATA समूहातील टायटन कंपनीचे समभाग त्यापैकीच एक आहेत. दिग्गज गुंतवणूकदार Rakesh Jhunjhunwala यांचा टायटनमध्ये मोठा हिस्सा आहे. गेल्या ५ सत्रांमध्ये टायटन कंपनीचे शेअर्स २१३४ रुपयांवरून २२९५ रुपयांपर्यंत वाढले आहेत. टायटनच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे या कालावधीत राकेश झुनझुनवाला यांनी ७२० कोटी रुपये कमावले आहेत.

टाटा समूहाच्या टायटन या कंपनीचे शेअर्स ४.६० टक्के वाढले आणि तिचे मार्केट कॅप १,९८,५९३ कोटींवर पोहोचले. Rakesh Jhunjhunwala यांना याचा मोठा फायदा झाल्याचे सांगितले जात आहे.

Rakesh Jhunjhunwala यांच्याकडे टायटनमध्ये ३,५३,१०,३९५ शेअर्ससह ३.९८ टक्के हिस्सा आहे. त्याच वेळी, राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीमध्ये ९५,४०,५७५ शेअर्ससह १.०७ टक्के हिस्सा आहे.

Rakesh Jhunjhunwala दाम्पत्याकडे टायटनचे एकूण ४,४८,५०,९७० शेअर्ससह ५.०५ टक्के हिस्सा आहे. टायटनचे शेअर्स १६०.७० रुपयांनी वधारल्यामुळे राकेश झुनझुनवाला यांच्या कमाईत सुमारे ७२० कोटी रुपयांची भर पडली असल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे, स्टार हेल्थ इन्शुरन्स (Star Health and Insurance) आणि मेट्रो ब्रँड्स (Metro Brands) च्या शेअर्सच्या किंमतीत गेल्या महिन्याभरात मोठी घसरण दिसून आली आहे. दोन्ही शेअर्सच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळे Rakesh Jhunjhunwala यांना तब्बल ५४० कोटी रूपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.

Rakesh Jhunjhunwala आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे स्टार हेल्थचे एकूण १०,०७,५३,९३५ शेअर्स आहेत. तर झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे मेट्रो ब्रँड्सचे ३९,१५३,६०० शेअर्स आहेत.

Rakesh Jhunjhunwala यांच्याकडे स्टार हेल्थ कंपनीच्या गेल्या एका महिन्यादरम्यान यात ३५.५५ रुपये प्रति शेअरची घसरण झाली. याचा अर्थ राकेश झुनझुनवाला यांना ३८८ कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.

तर, Rakesh Jhunjhunwala यांच्याकडे मेट्रो ब्राँड्सचेही शेअर्स आहेत. त्यात गेल्या महिन्याभराच्या कालावधीत ३९.०५ रुपये प्रति शेअरची घसरण झाली. यानुसार राकेश झुनझुनवाला यांचे १५२ कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे.

एका रिपोर्टनुसार, टायटनचा हिस्सा २,५९८ रुपयांपर्यंत जाऊ शकतो, जो सध्याच्या दरापेक्षा १५.७ टक्के अधिक आहे.

तर दुसरीकडे स्टार हेल्थच्या शेअरची किंमत ७०० रुपयांवरून घसरून 663 रुपये प्रति शेअरवर आली आहे. मेट्रो ब्रँड्सचे शेअर ५६२ रुपयांवरून घसरून ५२३ रुपयांवर आला आहे.