Rakesh Jhunjhunwala Stocks : राकेश झुनझुनवाला यांना अर्थसंकल्प फळला: काही तासांतच कमावले ३४२ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 07:22 PM2022-02-02T19:22:51+5:302022-02-02T19:30:27+5:30

Rakesh Jhunjhunwala Stocks : पाहा असं काय झालं की अर्थसंकल्पानंतर अवघ्या काही वेळातच झुनझुनवालांनी कमावले ३४२ कोटी रूपये.

Rakesh Jhunjhunwala Stocks : मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

अर्थसंकल्पादम्यान शेअर बाजारात (Share Market Stocks) व्ही शेप रिकव्हरी पाहायला मिळाली. परंतु दिग्गज गुंतवणूकदारा राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांना मात्र हा अर्थसंकल्प फळल्याचं दिसून आलं.

दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी काही तासांत टायटनच्या शेअर्समध्ये सुमारे ३४२ कोटी रुपये कमावले आहेत. २०२२ च्या अर्थसंकल्पात कट आणि पॉलिश्ड हिऱ्यांवरील कस्टम ड्युटी कमी करण्याच्या घोषणेनंतर टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी एकाच तासात मोठी उसळी पाहायला मिळाली.

टायटन हे जेम्स अँड ज्वेलरी व्यवसायात आहे. अर्थसंकल्प २०२२ च्या प्रस्तावामुळे कंपनीचा व्यवसाय मजबूत होईल, असे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.

१ फेब्रुवारी रोजी, दुपारी १.१५ च्या सुमारास, टायटन कंपनीच्या शेअर्सनं इंट्रा-डे नीचांकी रु. २,३५८.९५ (दिवसाच्या व्यवहारातील नीचांकी पातळी) गाठली. यानंतर पोस्ट बजेट रॅलीमध्ये टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये चांगलीच उसळी पाहायला मिळाली.

कंपनीचे शेअर्स २,४३६.०५ रुपयांवर बंद झाले. कंपनीचे शेअर्स ७५.७५ रुपयांनी वधारले. टायटनच्या शेअर्सच्या वाढीमुळे राकेश झुनझुनवाला यांच्या संपत्तीत अंदाजे ३४२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

टायटन कंपनीच्या ऑक्टोबर-डिसेंबर २०२१ च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे ३,५७,१०,३९५ शेअर्स आहेत, जे कंपनीच्या एकूण जारी केलेल्या पेड-अप कॅपिटलच्या ४.०२ टक्के आहे.

त्याच वेळी, त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनमध्ये ९५,४०,५७५ शेअर्स आहेत आणि कंपनीमध्ये १.०७ टक्के हिस्सा आहे. राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीच्या या कंपनीत एकूण हिस्सा ५.०९ टक्के आहे.

अल्पावधीत टायटन कंपनीचे शेअर्स २,५०० रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, कंपनीचे शेअर्स दीर्घ मुदतीसाठी २,८२० रुपयांपर्यंत जाऊ शकतात.