राकेश झुनझुनवालांच्या कंपनीची सरकारसोबत भागीदारी, शेअर्सच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 07:07 PM2022-07-12T19:07:27+5:302022-07-12T19:23:48+5:30

Rakesh Jhunjhunwala : या भागीदारीनंतर, मंगळवारच्या व्यापारादरम्यान कंपनीच्या शेअरचा भाव 7 टक्क्यांनी वाढला आहे.

शेअर मार्केटमधील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala Portfolio) यांच्या स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने, सरकार समर्थित कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) सोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीसंदर्भात वृत्त येताच, बाजारात स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्सचे शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांमध्ये झुंबड उडाली आहे.

या भागीदारीनंतर, मंगळवारच्या व्यापारादरम्यान कंपनीच्या शेअरचा भाव 7 टक्क्यांनी वाढला आहे. अर्थात सरकारसोबतच्या भागीदारीचे वृत्त आल्यानंतर, या शेअरची खरेदी वाढली आहे.

जाणून घ्या, नेमकी काय आहे भागीदारी? - इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत कॉमन सर्व्हिस सेंटर्स (CSC) आणि स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स एका नव्या प्रकल्पावर संयुक्तपणे काम करत आहेत. याअंतर्गत दोन्ही कंपन्यांनी, आरोग्याशी संबंधित विमा एका मोठ्या घटकापर्यंत पोहोचवण्याची योजना आखली आहे.

दोन्ही कंपन्यांच्या योजनेंतर्गत, टियर-II आणि टियर-III शहरांशिवाय ग्रामीण ग्राहकांपर्यंत देखील विमा उत्पादने पोहोचवली जातील. सध्या देशात 5 लाखांहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटर्स आहेत. हे सेंटर्स सरकारी योजना घरोघरी पोहोचवण्याचे काम करतात. विमा कंपन्या या सर्व केंद्रांच्या सहाय्याने आपल्या उत्पादनाची विक्रीही करू शकतील.

यामुळे करण्यात आली भागीदारी - यासंदर्भात माहिती देताना स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आनंद रॉय म्हणाले, कॉमन सर्व्हिस सेंटर्ससोबतच्या भागीदारीमुळे, ग्रामीण भारतातील लोकांच्या काही विशिष्ट गरजा पूर्ण करणारी आरोग्य विमा उत्पादने गावा-गावात पोहोचविणे सोपे होईल. खरे तर, कंपनीसाठी हे एक अधिक पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल सिद्ध होईल.

शेअर्सच्या खरेदीसाठी उडाली झुंबड - या भागीदारीनंतर स्टार हेल्थ आणि अलाईड इन्शुरन्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये झुंबड उडाली आहे. या कंपनीच्या शेअरने मंगळवारी 593.20 रुपयांचा उच्चांक गाठला आहे, आदल्या दिवसाच्या तुलनेत ही 7 टक्क्यांची वाढला आहे.

महत्वाचे म्हणजे, या कंपनीचे बाजार भांडवल 34 हजार कोटी रुपये आहे. तसेच, दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला हे स्टार हेल्थचे प्रमोटर आहेत. मार्च 2022 च्या तिमाहीनुसार, यात राकेश झुनझुनवाला यांची 14.40 टक्के, तर त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची 3.11 टक्के हिस्सेदारी आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)