Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला देऊ शकता 'ही' आर्थिक गिफ्ट; पाहा काय-काय आहेत पर्याय By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 02:19 PM 2024-08-19T14:19:34+5:30 2024-08-19T14:49:39+5:30
Raksha Bandhan 2024: यावेळी रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या बहिणीला अशी भेटवस्तू देऊ शकता ज्याचा तिला दीर्घकालीन खूप उपयोग होऊ शकतो. आज महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाची गरज पूर्वीपेक्षा अधिक जाणवू लागली आहे. Raksha Bandhan 2024: यावेळी रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या बहिणीला अशी भेटवस्तू देऊ शकता ज्याचा तिला दीर्घकालीन खूप उपयोग होऊ शकतो. आज महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाची गरज पूर्वीपेक्षा अधिक जाणवू लागली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला दिलेली आर्थिक भेट तिला हे तिला ध्येय साध्य करण्यास मदत करू शकतं. आर्थिक भेटवस्तू अनेक प्रकारच्या असू शकतात. रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपण याबद्दल जाणून घेऊ. तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार यापैकी कोणतीही भेटवस्तू निवडू शकता.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र - आपण बहिणीला महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, २०२३ देखील भेट देऊ शकता. महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावर ७.५ टक्के व्याजदर देण्यात येत आहे. त्यात किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक करता येते. याचा मॅच्युरिटी पीरियड २ वर्षांचा आहे. तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीनुसार यात गुंतवणूक करू शकता.
म्युच्युअल फंड - बहिणीसाठी लाँग टर्ममध्ये चांगला फंड उभा करायचा असेल तर त्यासाठी म्युच्युअल फंडाची एसआयपी उत्तम ठरेल. एसआयपीमधून जमा होणारे पैसे बहिणीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नात वापरता येऊ शकतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या बहिणीच्या नावानं म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करू शकता. एसआयपीची सुरुवात दरमहिन्याला ५०० रुपयांच्या गुंतवणुकीपासून होऊ शकते. आपण आपल्या नावानंही स्कीम सुरू करून बहिणीला नॉमिनी बनवू शकता. एसआयपीमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास मोठा फंड तयार होऊ शकतो. समजा तुम्ही आज तुमच्या बहिणीसाठी दरमहा ५०० रुपयांची एसआयपी सुरू करता. तुम्ही त्यात १० वर्षांसाठी गुंतवणूक करा. जर त्याचा वार्षिक परतावा १२ टक्के गृहीत धरला तर १० वर्षात तुम्ही ६०,००० रुपयांची गुंतवणूक कराल. १० वर्षांनंतर या रकमेत १२ टक्क्यांनुसार ५६,१७० रुपयांचं व्याज मिळेल आणि नंतर ही एकूण रक्कम १,१६,१७० रुपये होईल.
आरोग्य विमा पॉलिसी - तुम्ही तुमच्या बहिणीला हेल्थ इन्शुरन्सची भेटही देऊ शकता. यामुळे गरज भासल्यास बहिणीची वैद्यकीय सेवेच्या खर्चातून सुटका होईल. गेल्या काही वर्षांत ज्या प्रकारे उपचारांचा खर्च वाढला आहे, त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीसाठी आरोग्य विमा आवश्यक आहे. जेव्हा वैद्यकीय आणीबाणीमुळे त्यांच्या बचतीचा मोठा भाग खर्च होतो तेव्हा बऱ्याच लोकांना त्याचं महत्त्व समजतं. बहिणीला हेल्थ पॉलिसी गिफ्ट केल्यानं मेडिकल इमर्जन्सीच्या प्रसंगी खर्चाची चिंता राहणार नाही.
गोल्ड बॉन्डचं गिफ्ट - रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला गोल्ड म्युच्युअल फंड, गोल्ड ट्रेडेड फंड किंवा सॉव्हरेन गोल्ड बॉन्डची भेटही दिली जाऊ शकते. गेल्या काही वर्षांत गोल्ड बॉन्डकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने अनेकजण बहिणीला दागिने भेट देतात. पण त्या तुलनेत गोल्ड बॉन्डचा पर्यया उत्तम ठरू शकतो.
बँक एफडी - जर तुमची लहान बहीण असेल आणि तिचं बँकेत बचत खातं नसेल तर तुम्ही रक्षाबंधनाच्या निमित्ताने तिला हे गिफ्ट देऊ शकता. बँक खातं हे आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेनं उचललेलं पहिलं पाऊल आहे. तुम्ही तुमच्या बहिणीच्या नावानं बँक खाते उघडू शकता. त्यात तुम्ही एकरकमी रक्कम टाकू शकता. तुमची बहीण ही रक्कम बँकेच्या एफडी खात्यात ठेवू शकते. यामुळे तिला व्याजाद्वारे उत्पन्न मिळेल, जे भविष्यात तिच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.