कंपनीवर प्रसन्न झाले ‘श्रीराम’, अयोध्येतील राम मंदिरानंतर मिळाला आणखी एक मोठा प्रोजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 04:38 PM2024-01-16T16:38:19+5:302024-01-16T16:41:17+5:30

अयोध्येत एक हजार वर्षे टिकणारे भव्य राम मंदिर उभारणाऱ्या L&T कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे.

Larsen & Toubro : येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलालाची प्रतिष्ठापणा होत आहे, यामुळे अवघा देश राममय झाला आहे. या भव्य सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. मंदिर परिसरालाही अंतिम स्वरुप देण्याचे काम वेगाने सुरू आहे. देशातील सुप्रसिद्ध कंपनी लार्सन टुब्रो (L&T) कडे राम मंदिर उभारत आहे. अशातच या कंपनीसंदर्भात एक बातमी आली आहे.

या कंपनीवर साक्षात भगवान राम प्रसन्न झाले आहेत. याचे कारण म्हणजे, मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम या कंपनीला मिळाले आहे. मंगळवारी याबाबत माहिती देताना L&T ने सांगितले की, कंपनीच्या बांधकाम विभागाला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या हाय-स्पीड विद्युतीकरण प्रणालीची 'मेगा ऑर्डर' मिळाली आहे.

L&T कन्स्ट्रक्शनच्या रेल्वे स्ट्रॅटेजिक बिझनेस ग्रुपने सांगितले की, एका मान्यताप्राप्त जपानी कंपनीकडून ही ऑर्डर मिळाली आहे. कंपनीद्वारे या संपूर्ण मार्गाचे(508 किलोमीटर) विद्युतीकरण केले जाईल. कंपनीने BSE ला दिलेल्या फाइलिंगमध्येही ही माहिती दिली आहे. दरम्यान, या विद्युतीकरण प्रणालीमुळे गाड्यांना ताशी 320 किलोमीटर वेगाने प्रवास करण्यास मदत होईल.

या प्रकल्पाला जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (JICA) द्वारे वित्तपुरवठा केला जात आहे आणि नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने काम करणार्‍या अधिकृत जपानी एजन्सीद्वारे त्याची अंमलबजावणी केली जात आहे. L&T ने कराराचे नेमके मूल्य उघड केलेले नाही, परंतु जेव्हा त्याची किंमत रु. 10,000-15,000 कोटींच्या दरम्यान असते, तेव्हाच त्याला ती ऑर्डर 'मेगा' मोजली जाते.

या बातमीनंतर लार्सन अँड टुब्रोच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. दुपारी 12:53 वाजता कंपनीचे शेअर्स सुमारे एक टक्क्यांच्या वाढीसह 3571.40 रुपयांवर व्यवहार करत आहेत. तर ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचे शेअर्स 3588 रुपयांवर पोहोचले. 15 जानेवारीच्या ट्रेडिंग सत्रात कंपनीचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी 3,605.55 रुपयांवर पोहोचले होते. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 4.91 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. (टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)