Ratan Tata Biography: गुड न्यूज! रतन टाटा यांचा जीवनपट आता पुस्तकरुपात जगासमोर येणार; किती कोटींना झाला करार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 12:44 PM2022-01-09T12:44:07+5:302022-01-09T12:51:03+5:30

Ratan Tata Biography: आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्था हार्पर कॉलिन्स रतन टाटा यांचा जीवनपट प्रकाशित करणार आहे. कोण आहेत लेखक? जाणून घ्या...

TATA ग्रुप आताच्या घडीला अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. याच टाटा समूहाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे ज्येष्ठ, दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचा जीवनपट पुस्तकरुपात येणार आहे.

Ratan Tata यांचा केवळ भारतात नाही, तर जगभरात दबदबा आहे. रतन टाटा यांची जीवन प्रवास हा तितकाच रंजक आणि संघर्षमय आहे. टाटांसारख्या बड्या कुटुंबात जन्मलेल्या रतन टाटा यांना सर्व गोष्टी सहजरित्या मिळाल्या असे नाही. त्यासाठी त्यांनाही कष्ट करावे लागले.

Ratan Tata यांचा हाच जीवनप्रवास आता पुस्तकरुपात सर्वांसमोर येणार आहे. रतन टाटा यांची अप्रकाशित गुपिते, करिअरची वळणे तसेच TATA समूहासोबतच्या प्रवासाचा वेध चरित्रातून घेतला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्था हार्पर कॉलिन्स (Harper Collins) टाटांचे चरित्र प्रकाशित करणार आहे.

‘मिंट’च्या वृत्तानुसार, हार्पर कॉलिन्सने ग्लोबल प्रिंट राईट्स, ऑडियोबुक तसेच ई-बुकचे प्रकाशन हक्क २ कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. आजवरच्या जगातील महागड्या लेखन करारांत टाटांच्या चरित्राचा समावेश होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

आजवर जगासमोर न आलेले रतन टाटा पुस्तकातून भेटीला येणार असल्याने उद्योगजगतासह जगभरातील वाचकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. हार्पर कॉलिन्सने टाटांच्या आत्मचरित्रासाठी जागतिक स्वामित्व हक्क मिळविले आहे. माजी सनदी अधिकारी थॉमस मॅथ्यू टाटांचा जीवनप्रवास शब्दबद्ध करणार आहेत.

आत्मचरित्राच्या निर्मितीला सुरुवात झाली असून, यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात टाटांचे चरित्र पुस्तक वाचकांच्या भेटीस येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. आजवर प्रकाशात न आलेल्या अव्यक्त पैलूंचा उलगडा यामुळे होण्यास सहाय्य होणार आहे.

प्राथमिक स्वरुपाच्या संशोधनासाठी कागदपत्रे, पुस्तके तसेच रतन टाटांच्या क्लासरुम ते बोर्डरुम अशा प्रवासात सोबत असणाऱ्या व्यक्तींसोबत चर्चा केली जात आहे. लेखक थॉमस मॅथ्यू यांनी प्रत्यक्ष लेखनाला सुरुवात करण्यापूर्वी पुस्तकाची प्राथमिक रुपरेषा निश्चित केली आहे.

रतन टाटांच्या आयुष्यातील अनेक व्यक्तींशी चर्चा केली आहे. रतन टाटांच्या आयुष्यावरील एकमेव अधिकृत पुस्तक ठरणार आहे. त्यामुळे पुस्तक संदर्भयुक्त असण्यावर प्रकाशन संस्थेकडून भर दिला जात आहे.

रतन टाटांच्या आत्मचरित्रासाठी टाटा ग्रूप माहितीचा अधिकृत स्त्रोत ठरणार आहे. लेखक मॅथ्यू यांना सर्व महत्वाची कागदपत्रे, फोटो उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. रतन टाटांच्या आजवरच्या कार्यकाळातील टाटा ग्रूपचे ऐतिहासिक निर्णय, महत्वाचे करार यांचा पुस्तकात समावेश असणार आहे.

आत्मचरित्राचे नायक रतन टाटा यांच्याशी प्रत्यक्ष संवादावर लेखक मॅथ्यू यांचा भर आहे. टाटांसोबत तासनतास चर्चा करण्यात येत असल्याचे मॅथ्यूंनी म्हटले आहे. रतन टाटांचे आत्मचरित्र केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रकाशित केले जाणार आहे.

इंग्रजीसोबत अन्य भाषेत पुस्तक छापले जाईल. पुस्तकांची निर्मिती इंग्लंडमध्ये केली जाणार आहे. हार्पर कॉलिन अमेरिकेत पुस्तकाची छपाई करणार आहे. दरम्यान, TATA समूह जगातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा अनेकविध क्षेत्रात टाटा ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

शेअर मार्केटमध्ये सर्वाधिक सूचीबद्ध कंपन्या TATA ग्रुपच्या आहेत. आतापर्यंत अनेकविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या TATA ग्रुपच्या एकूण २९ कंपन्या शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झालेल्या आहेत. TATA ग्रुपमधील टीसीएसनंतर टायटन कंपनीचा मार्केट कॅप दुसऱ्या क्रमांकावर आहे.

याशिवाय एका अहवालानुसार, रतन टाटा नोकऱ्या देण्यात आघाडीवर असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. टीसीएसने देशात सर्वाधिक नोकऱ्या दिल्याचे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. TCS ने ५.६ लाखांहून अधिक रोजगार दिले आहेत.