N. Chandrasekaran: शेतकऱ्याच्या मुलावर टाटांचा विश्वास! पाहा, एन. चंद्रशेखरन यांची यशस्वी कारकीर्द अन् पुढील आव्हानं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 04:12 PM2022-02-14T16:12:58+5:302022-02-14T16:19:41+5:30

N. Chandrasekaran: शेतकरी कुटुंबातील संघर्षमय जीवन ते एअर इंडियाची घरवापसी; पाहा, रतन टाटांचा विश्वास सार्थक ठरवणाऱ्या एन. चंद्रशेखरन यांची कारकीर्द

रतन टाटा (Ratan Tata) यांचा टाटा ग्रुप (TATA) अनेकविध क्षेत्रात यशस्वीरित्या कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. यामधील महत्त्वाची कंपनी म्हणजे टाटा सन्स (Tata Sons). या कंपनीच्या अखत्यारित अनेक कंपन्या कार्यरत असून, त्या दमदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत.

यातील एन. चंद्रशेखरन यांची पुन्हा एकदा टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (N. Chandrasekaran)

एन. चंद्रशेखरन (Natarajan Chandrasekaran) यांचा कार्यकाळ ५ वर्षांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१७ मध्ये चंद्रशेखरन यांची पहिल्यांदा टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा हा कार्यकाळ २० फेब्रुवारी रोजी पूर्ण होणार होता.

एन. चंद्रशेखरन यांचा जन्म सन १९६३ मध्ये तामिळ शेतकरी कुटुंबात झाला. घरातील परिस्थिती हलाखीची होती. आपल्या भावांबरोबर ते दरररोज ३ कि.मी अंतर चालून शाळेत जायचे. त्यानंतर त्यांनी त्रिचीच्या इंजिनीअरिंग कॉलेजमधून कॉम्पुटर अँप्लिकेशनमध्ये मास्टर केले. सन १९८७ मध्ये ते 'टाटा कन्सल्टन्सी सर्विस'(TCS)चे इंटर्न म्हणून कार्य करत होते.

सन २००९ मध्ये TCS कंपनीत सीईओ म्हणून रुजू झाले. त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांचे नेतृत्व शैली उत्कृष्ट आहे. एन. चंद्रशेखरन हे टाटा समूहाचे पहिले असे अध्यक्ष आहेत ज्यांच्या परिवारातील कोणीही उद्योजक नव्हते.

TATA समूह नेतृत्वाच्या संकटातून जात असताना एन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या कार्यकारी अध्यक्षपदी पहिल्यांदा नियुक्ती करण्यात आली. कंपनीने सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून हटवले होते. त्याविरोधात मिस्त्री यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारला होता.

नंतर समूहाला संकटातून बाहेर काढण्यासाठी तसेच TCS, Tata Motors, Tata Steel सारख्या दिग्गज कंपन्यांच्या वाढीला चालना देण्याची जबाबदारी चंद्रशेखरन यांच्यावर होती. या कामात ते शंभर टक्के यशस्वी झाले आहेत.

चंद्रशेखरन यांच्या पहिल्या कार्यकाळात टाटा समूहाने केवळ सायरस मिस्त्री वादावर मात केली नाही तर समूहातील अनेक कंपन्यांसाठी चांगली कामगिरी केली. चंद्रशेखर यांना टाटा समूहात ३४ वर्षांचा अनुभव आहे.

गेल्या पाच वर्षांत, TATA समूहाच्या प्रमुख कंपन्यांनी गुंतवणूकदारांचीही चांदी केली आहे. चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली TCS ही देशातील सर्वात मोठी कंपनी बनण्यात यशस्वी झाली. बाजार भांडवलाच्या बाबतीत, ही कंपनी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमधील अंतर खूपच कमी आहे. याचे बरेचसे श्रेय चंद्रशेखरन यांना जाते.

TATA समूहातील दिग्गज TCS या कंपनीचे शेअर्स गेल्या पाच वर्षांत तिप्पट झाले आहेत. १७ फेब्रुवारी २०१७ रोजी शेअरची किंमत १२०३ रुपये होती. सध्या या शेअरची किंमत ३७०६ रुपये आहे.

TATA समूहाने अनेक योजना भविष्य काळासाठी बनविल्या आहेत. टाटा समूहाने नुकताच एअर इंडियाचा ताबा घेतला आहे. एअर इंडियाचे व्यवस्थापन सध्या मोडकळीच्या अवस्थेत आहे. त्यास सुरळीत करणे हे एक मोठे टास्क टाटा समूहासमोर आहे.

TATA समूहाचे अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या मोठ्या कंपनीना टक्कर देणारी ऑनलाईन ग्रोसरी मार्केट निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. TATA समूहाचा इलेकट्रोनिक विभागही मोठ्या प्रमाणावर विविध प्रकल्प हाती घेत आहे. टाटा सोलर पॉवर हि मोठ्या प्रमाणावर भविष्याच्या ऊर्जा टंचाईवर मात करण्यासाठी काम करत आहे.

TATA समूहाच्या दोन डझनहून अधिक सूचीबद्ध कंपन्या आहेत. टीसीएस, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा केमिकल्स या समूहाच्या मोठ्या कंपन्या आहेत. टाटा सन्सचे अध्यक्षपद हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ते टाटा समूहातील कंपन्यांचेही प्रमुख आहे.