Ratan Tata Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले रतन टाटा; दानच ९००० कोटींवर केलेले... By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 09:50 AM 2024-10-10T09:50:17+5:30 2024-10-10T09:59:52+5:30
Ratan Tata Net Worth: रतन टाटा हे दानशूर होतेच, यामुळे त्यांच्या उत्पन्नातील मोठा हिस्सा ते दान करायचे आणि आपल्या कंपन्यांनाही करायला लावायचे. जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आज त्यांच्यावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दोन दिवसांपूर्वी रतन टाटा यांना मुंबईतील ब्रीचे कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटांनी टाटा समुहाला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांच्याकडे ३८०० कोटींची संपत्ती असली तरी त्यांचे राहणीमान एकदम साधे होते. यामुळेच ते लोकांमध्ये खूप प्रसिद्ध होते.
रतन टाटांची एकूण संपत्ती ही ३८०० कोटींची आहे. यामध्ये टाटा ग्रुप, टाटा सन्समधून त्यांना सर्वाधिक उत्पन्न मिळालेले आहे. रतन टाटा हे दानशूर होतेच, यामुळे त्यांच्या उत्पन्नातील मोठा हिस्सा ते दान करायचे आणि आपल्या कंपन्यांनाही करायला लावायचे.
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष म्हणून रतन टाटांना वर्षाला २.५ कोटी रुपयांचे मानधन मिळत होते. त्यांच्या उत्पन्नात टाटा सन्समधील स्टेकचाही वाटा होता. रतन टाटांकडे इतरही मालमत्ता होत्या. यामध्ये ते कुलाब्याला राहत असलेले घर, ज्याची किंमत १५० कोटींहून अधिक आहे.
रतन टाटांना टाटा सन्समधून जेवढे उत्पन्न मिळायचे त्याच्या 66% भाग ते चॅरिटेबल ट्रस्टला वळते करायचे. हा पैसा शिक्षण आणि आरोग्य सेवेसह अन्य लोकोपयोगी कामांसाठी वापरला जातो.
याचबरोबर रतन टाटा यांनी अनेक स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. ज्यामध्ये ओला आणि पेटीएम सारख्या प्रसिद्ध कंपन्यांचा समावेश आहे. यातून नाविन्यपूर्णतेला चालना देण्यात आणि तरुण उद्योजकांना पाठिंबा ते देत होते.
रतन टाटांना कारचेही वेड... रतन टाटांच्या ताफ्यात टाटा कार मॉडेल्सपासून ते लक्झरी ब्रँड्सही आहेत. टाटा नॅनोपासून ते मर्सिडीज, कॅडिलॅक आदी कार त्यांच्याकडे आहेत. टाटा नेक्सॉन, मर्सिडीज-बेंझ एसएल५००, लँड रोव्हर फ्रीलँडर, मसराटी क्वाट्रोपोर्टे, कॅडिलॅक एक्सएलआर, शेवरलेट कार्वेट, होंडा सिविक या कार आहेत.
रतन टाटा यांनी आरोग्यसेवा, शिक्षण, ग्रामीण विकास आणि सामाजिक कल्याण आदींसाठी सुमारे 9,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या देणग्या दिलेल्या आहेत. यामध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलला $50 दशलक्ष, कॉर्नेल विद्यापीठात भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी $28 दशलक्ष, कार्नेगी मेलॉन विद्यापीठाला $35 दशलक्ष दान केलेले आहेत.
रतन टाटा यांचे जीवन आणि कारकीर्द व्यवसायातील यश आणि सामाजिक जबाबदारी यांच्यातील संतुलनाचे उत्तम उदाहरण आहे. कोणताही वाद नाही, केवळ व्यवसायच करायचा नाही तर समाजकार्य करून लाखो लोकांच्या आयुष्यात सुखाचे क्षण आणण्याचे काम रतन टाटा यांनी केले.