सणासुदीपूर्वी सरकारने आणली खास योजना, स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी

By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 10, 2020 03:12 PM2020-10-10T15:12:12+5:302020-10-10T15:27:27+5:30

सणासुदीचा सिझन सुरू होत आहे. यापूर्वीच पुन्हा एकदा स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी मिळत आहे. मात्र, हे सोनं फिजिकल नव्हे तर बॉन्‍डच्या स्वरुपात असणार आहे.

केंद्र सरकारच्या चर्चित गोल्ड बॉन्ड योजनेंतर्गत स्वस्त दरात सोने दिले जाते. सोन्याची किंमत रिझर्व बँकेकडून निश्चित केली जाते. ही किंमत बाजार मुल्याच्या तुलनेत कमी असते.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिलेल्या माहितीनुसार, यावेळी गोल्ड बॉन्डची किंमत 5,051 रुपये प्रति ग्रॅम एवढी निश्चित करण्यात आली आहे.

गोल्ड बॉन्डसाठी ऑनलाईन अर्ज आणि डिजिटल पद्धतीने पैसे जमा करणाऱ्यांसाठी प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट मिळणार आहे.

अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बॉन्डची किंमत 5,001 रुपये प्रति ग्रॅम एवढी असेल.

गोल्ड बॉन्ड योजनेंतर्गत सोनं विकत घेण्याची ही योजना 12 ते 16 ऑक्‍टोबरपर्यंत असेल.

हे सोने बॉन्‍डच्या स्वरुपात दिले जाते. अर्थात आपल्याला ज्वेलरीप्रमाणे या सोन्याचा वापर करता येत नाही.

याला गुंतवणुकीसाठी प्राथमिकता दिली जाते. या योजनेचा मॅच्यूरिटी कालावधी आठ वर्ष एवढा आहे. पाच वर्षानंतर यातून बाहेर पडण्याचाही पर्याय आहे.

गोल्ड बॉन्डमध्ये किमान एक ग्रॅम सोन्याची गुंतवणूक केली जाऊ शकते. तसेच सामान्य नागरिकांसाठी यात अधिकांश गुंतवणुकीची मर्यादा चार किलो सोने आहे.

हे सोने विकत घेण्यासाठी आपल्याला आपली बँक, बीएसई, एनएसईच्या वेबसाईट अथवा पोस्ट ऑफीसशी संपर्क साधावा लागेल.

येथून गोल्ड बॉन्ड डिजिटलपद्धतीने विकत घेतले जाऊ शकतात. ही एक प्रकारची अत्यंत सुरक्षित गुंतवणूक आहे. कारण यात सोन्याच्या शुद्धतेची आणि सुरक्षिततेचीही चिंता नसते.

यावेळी, सोन्याची खरेदी टळल्यास तुम्हाला नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल. ही योजना 9 नोव्हेंबरपासून 13 नोव्हेंबरपर्यंत पुन्हा एकदा खुली होईल.

ही योजना सुरू करण्यामागचा सरकारचा हेतू, आयात आणि फिजिकल सोन्याची मागणी कमी करणे असा आहे.