RBI Monetary Policy: आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यानंतर होम लोनचा ईएमआय किती वाढणार? समजून घ्या गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 02:04 PM2022-12-07T14:04:00+5:302022-12-07T14:12:31+5:30

बुधवारी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.३५ टक्क्यांची वाढ केली. मे महिन्यापासून करण्यात आलेली ही पाचवी वाढ आहे.

रिझर्व्ह बँकेने बुधवारी सर्वसामान्यांना पुन्हा एकदा जोरदार झटका दिला आहे. आरबीआयने यावर्षी सलग पाचव्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.३५ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता रेपो रेट ५.९० टक्क्क्यांवरून वाढून ६.२५ टक्क्यांवर पोहोचणार आहे.

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे आता होमलोनसह सर्वप्रकारची कर्जे महागणार आहेत.  पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रिझर्व्ह बंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दर वाढवण्याची घोषणा केली.  रिझर्व्ह बँकेने मे महिन्यापासून आतापर्यंत पाचवेळा रेपोरेट वाढवला असून, तेव्हापासून आतापर्यंत २.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सध्या महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या टार्गेटपेक्षा अधिक आहे. त्यामुळे सध्या महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्नशील आहे. अमेरिकेसहित अनेक मोठ्या देशांमध्ये केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढवले आहे. रेपो रेट वाढवल्यानंतर आता होम, कारसह अन्य व्याजदरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बँका लोनचा व्याजदर निश्चित करताना रेपो रेट बेंचमार्क म्हणून निश्चित करतात. रेपो रेट कमी झाल्यानंतर बँका इंटरेस्ट रेट कमी करतात.

रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट वाढवण्याचा परिणाम जुन्या आणि नव्या दोन्ही ग्राहकांवर पडणार आहे. ज्या लोकांनी फ्लोटिंग रेटवर लोन घेतलं आहे, त्यांचे ईएमआय नाढतील. कार, पर्सनल लोनसह अन्य प्रकारचे लोनही महाग होतील. अनेकदा रेपो दर वाढल्यानंतर बँका त्वरित कर्जाचे ईएमआय वाढवतात.

तुमचा ईएमआय किती वाढेल हे तुम्ही किती लोन घेतलंय आणि किती कालावधी शिल्लक आहे यावर अवलंबून असेल. जर तुमचा कालावधी अधिक असेल तर तुमचा ईएमआयही अधिक वाढेल. याचं कारण मे महिन्यानंतर व्याज दरामध्ये २.२५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

जर तुम्ही या वर्षी मार्च महिन्यात ३० लाखांचं लोन घेतलं असेल आणि त्याचा कालावधी २० वर्षे आहे. जर एप्रिल महिन्यात व्याजगर ७ टक्के होता, तर तो जानेवारीमध्ये वाढून ९.२५ टक्के होईल. तुमचा ईएमआय २३.२५८ रुपयांवरून वाढून२७,३८७ रूपये होईल. हे तेव्हा होईल जेव्हा तुमचा कालावधी २० वर्षे असेल. याचा अर्थ तुमचा ईएमआय १७.७५ टक्क्यांनी वाढेल. जर तुम्ही कर्ज ३० वर्षांसाठी घेतलं असेल तर ईएमआयमध्ये २३ टक्क्यांची वाढ होईल.

रिझर्व्ह बँकेने ४ मे रोजी ०.४ टक्के, ८ जून रोजी ०.५ टक्के, ५ ऑगस्ट रोजी ०.५ टक्के आणि ३० सप्टेंबर रोजी रेपोरेटमध्ये ०.५ टक्क्यांनी वाढ केली होती. मे महिन्यात व्याजदरांमध्ये ०.४० टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. आरबीआयकडून २०२३ मध्ये रिटेल महागाई दराचं अनुमान हे ६.७ टक्के कायम ठेवण्यात आले आहे. 

पुढील वर्षभर महागाईचा दर हा ४ टक्क्यांच्या वर राहण्याची शक्यता आहे. तसेच २०२३ या आर्थिक वर्षात जीडीपीमधील वाढ ही ६.८ टक्के एवढी राहण्याची शक्यता आहे. आबीआयकडून रेपोरेटमध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात होता. महागाईपासून दिलासा मिळाला तरी रिझर्व्ह बँक रेपो रेटमध्ये २५ ते ३५ बेसिस पॉईंटने वाढ करेल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. गेल्या बऱ्याच दिवसांपासून देशातील महागाई ही उच्च स्तरावर आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यामध्ये महागाईपासून दिलासा मिळाला होता.