Record Liquor Sale: कितीबी होऊदे महाग! मद्याच्या किंमती वाढल्या, तरीही तुफान विक्री; ‘याचा’ सर्वाधिक सेल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 01:22 PM2023-05-10T13:22:18+5:302023-05-10T13:38:21+5:30

भारतात गेल्या काही काळात मद्याच्या किमती वाढल्या असल्या तरी त्याची विक्रीही वाढली आहे.

भारतात गेल्या काही काळात मद्याच्या किमती वाढल्या असल्या तरी त्याची विक्रीही वाढली आहे. ही मागणी सर्वच विभागांमध्ये दिसून येते. मग ती व्हिस्की असो, ब्रँडी, रम, जिन किंवा वोडका.

इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, 2023 मध्ये 40 कोटी मद्याती कार्टन्स खरेदी करण्यात आली. ही 750 मिलीच्या सुमारे 4.75 अब्ज बॉटल्स इतकी आहेत. देशातील बाजारातील मद्य विक्रीचे आकडेही या वस्तुस्थितीला पुष्टी देतात.

या वर्षी मार्चपर्यंत 395 दशलक्ष कार्टन्स विकले गेले आहेत, जे गेल्या वर्षी 2022 च्या तुलनेत 12 टक्क्यांनी अधिक आहे. यापूर्वी एवढी विक्री चार वर्षांपूर्वी झाली होती. आम्ही आमच्या किमती सर्वोच्च पातळीवर ठेवल्या आहेत, अशी माहिती पेर्नोड रिकार्ड, ग्लोबल चीफ फायनान्शिअल ऑफिसर, हेलन डी टिसन यांनी सांगितलं.

एक्साईज डेटा नुसार, मद्याच्या एकूण मागणीपैकी व्हिस्कीचा वाटा दोन तृतीयांश आहे. जास्त किंमती असूनही, व्हिस्कीची मागणी 11 टक्क्यांनी वाढल्याचं समोर आलंय. ब्रँडीचा बाजारातील हिस्सा 21 टक्के आहे, तर रमचा 12 टक्के आहे.

व्होडका विक्री 29 टक्क्यांनी वाढली असून जिनच्या विक्रीत 61 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. अर्थात, आर्थिक वर्ष 21 मध्ये, अनेक विक्रीत घट झाली होती. परंतु गेल्या आर्थिक वर्षात यात पुन्हा वाढ झालीये.

उदाहरणार्थ अलाईड ब्लेंडर्सनं (Allied Blenders) १५ टक्क्यांची वाढ नोंदवली. यामध्ये मोठा वाटा ऑफिसर्स चॉईसचा आहे. अलाईड ब्लेंडर्सनं आणखीही काही ब्रँड्स लाँच केले आहेत. यामध्ये आयकॉनिक व्हाईट व्हिस्की, सृष्टी प्रीमिअम व्हिस्की, X&O प्रीमियम वर्ल्ड ग्रेन व्हिस्की यांचा समावेश आहे.

टिळकनगर इंडस्ट्रीजनं प्रीमियम फ्लेवर्ड ब्रीडी मॅन्शन हाउस रिझर्व्ह लाँच केलंय. मागणीच्या बाबतीत गेल्या वर्षी कोणतीही अडचण नव्हती. काही राज्यांनी उत्पादनाच्या किमतीत वाढ झाल्याचे पाहून किंमत वाढवण्यास परवानगी दिली, अशी माहिती कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेव्हरेज कंपनीजचे (CIABC) महासंचालक विनोद गिरी यांनी दिली.

मात्र, एका वर्षात काचेची किंमतही जवळपास दुप्पट झाली आहे. यामुळे कंपन्यांचं मार्जिन कमी झालं आहे. राजस्थान, केरळसह डझनभर राज्यांनी किंमत वाढवण्यास परवानगी दिल्याचंही ते म्हणाले.