Repo Rate महागल्यानंतर लोनचे व्याजदर वाढले, मग का नाही वाढले सेव्हिंगवरील व्याज? By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 01:28 PM 2023-02-20T13:28:34+5:30 2023-02-20T13:31:31+5:30
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर देशातील बँका एफडीचे व्याजदर वाढवत आहेत. पण, बचत खात्यावरील व्याजदर निश्चित आहे यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर देशातील बँका एफडीचे व्याजदर वाढवत आहेत. पण, बचत खात्यावरील व्याजदर निश्चित आहे यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मे 2022 पासून आतापर्यंत रेपो दरात एकूण 6 वेळा वाढ करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलीकडेच रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्स (BPS) ने वाढ केली आहे. त्यामुळे आता कर्ज महाग झाली आहेत. देशातील खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका मुदत ठेवींवर (FD) व्याजदर वाढवत आहेत. पण बचत खात्यावरील व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. यामुळे ग्राहक सेव्हींग खात्यावर पैसे ठेवण्याचे टाळत आहेत. चालू आर्थिक वर्षात, मे 2022 पासून आतापर्यंत, रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 2.50 टक्क्यांनी वाढ केली आहे.
या काळात देशातील खासगी आणि सरकारी बँकांनी एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या ठेवींच्या व्याजदरात 0.35-2.75 टक्क्यांनी वाढ केली आहे. दोन वर्षे ते तीन वर्षांच्या FD वर व्याजदर 0.35-2.25 टक्क्यांनी वाढले आहेत.
डिसेंबरपर्यंत गेल्या एका वर्षात ठेवींचे दर सरासरी 0.74 टक्क्यांनी वाढले आहेत. दरम्यान, कर्जाचे व्याजदर 0.66 टक्क्यांनी वाढले आहेत. पण बचत खात्यावर मिळणारे व्याजदर फक्त तीन टक्केच स्थिर आहेत. त्यामुळे बँकेच्या चालू आणि बचत खात्यांमध्ये थोडीशी घट झाली आहे. चालू खाती हे बँकांसाठी भांडवल उभारणीचे आर्थिक स्रोत आहेत.
क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड अॅनालिटिक्सच्या अहवालानुसार, गेल्या तीन आर्थिक वर्षांत बचत खात्यांवरील व्याजदर 2.70-3 टक्क्यांवर स्थिर राहिले आहेत. पूर्वी सरासरी वार्षिक दर चार टक्के होता. गेल्या तीन वर्षांत कर्जाचे सरासरी दर 0.70 टक्क्यांनी आणि मुदत ठेवींच्या व्याजदरात एक टक्क्यांनी वाढ झाली आहे.
देशातील खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका एफडी आकर्षक करण्यासाठी व्याजदर वाढवत आहेत. पण बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजात कोणताही बदल झालेला नाही. यामुळे ग्राहक बचत खात्यात कमी पैसे जमा करत आहेत.
मे 2022 पासून आतापर्यंत, रेपो दर सलग सहा वेळा वाढला आहे आणि या कालावधीत तो एकूण 2.50 ने वाढला आहे. सध्या रेपो दर 6.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात वाढ झाल्याने सर्व प्रकारची गृह, वाहन, वैयक्तिक कर्जे महाग झाली आहेत.
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करण्याची प्रक्रिया मे 2022 पासून सुरू केली होती. त्यानंतर रेपो दरात 0.40 टक्के वाढ करण्यात आली. पुढील महिन्यात, जूनमध्ये, आरबीआयने पुन्हा व्याजदर 0.50 टक्क्यांनी वाढवले. हा कल कायम राहिला आणि ऑगस्ट महिन्यात 0.50 टक्क्यांनी वाढ झाली.
सप्टेंबरमध्येही मध्यवर्ती बँकेने पॉलिसी रेट 0.50 टक्क्यांनी वाढवले होते आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये रेपो दरात पाचव्यांदा वाढ करण्यात आली होती. यानंतर, रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी 2022 मध्ये शेवटच्या वेळी रेपो दरात वाढ केली आहे.