Retirement Planning Guide : ₹२ लाखांचं Pension मिळवण्यासाठी महिन्याला किती करावी गुंतवणूक? समजून घ्या गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 10:51 AM2024-08-08T10:51:06+5:302024-08-08T11:02:05+5:30

How Retirement Planning Works : आजकाल अनेक जण गुंतवणूकीकडे वळताना दिसतात. पण जशी आता पैशांची गरज असते तशी रिटारमेंटनंतरचीही सोय करणं तितकंच आवश्यक आहे.

आजकाल अनेक जण गुंतवणूकीकडे वळताना दिसतात. पण जशी आता पैशांची गरज असते तशी रिटारमेंटनंतरचीही सोय करणं तितकंच आवश्यक आहे. रिटायरमेंट प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी उत्तम साधन म्हणजे एनपीएस.

निवृत्तीची योजना आखताना उलटमोजणी करावी लागते. म्हणजे तुम्हाला किती पैसे गुंतवायचे आहेत हे पाहण्याची गरज नाही, तर निवृत्तीनंतर तुम्हाला किती पैशांची गरज आहे हे समजून घेण्याची गरज आहे. चला जाणून घेऊया, जर तुम्हाला २ लाखांची पेन्शन घ्यायची असेल तर २ लाखांच्या पेन्शनसाठी गुंतवणूक कशी करावी.

आजच्या काळात मेट्रो शहरांचा विचार केला तर तिथे चांगलं आयुष्य जगण्यासाठी दरमहा सुमारे किमान ४० ते ५० हजार रुपयांची गरज भासते. यात तुमचं घरभाडं, गाडीचा खर्च, तुमचं खाणं- पिणं आणि प्रवास यांचा समावेश असेल.

आता जर तुमचं वय आज ३० वर्षे असेल आणि ३० वर्षांनंतर म्हणजे वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला काहीही न करता असं आयुष्य जगायचं असेल तर त्यावेळी तुम्हाला आजपेक्षा ३-४ पट अधिक पैशांची गरज भासणार आहे. म्हणजेच निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा सुमारे २ लाख रुपयांची गरज भासणार आहे.

सध्याचा एफडीचा दर पाहिला तर तो ६-७ टक्क्यांच्या जवळपास आहे. आपण असं गृहीत धरू की जेव्हा आपण निवृत्त होऊ तेव्हा आपल्याला कमीतकमी ५% व्याज मिळेल आणि जर आपल्याला जास्त व्याज मिळालं तर आपल्याला अधिक फायदा होईल. अशा तऱ्हेनं जर तुम्हाला दरमहा २ लाख रुपये हवे असतील तर तुम्हाला वार्षिक २४ लाख रुपयांच्या व्याजाची गरज भासणार आहे. जर तुम्हाला ५ टक्के दराने २४ लाख रुपयांचं व्याज हवं असेल तर त्यासाठी तुमच्याकडे सुमारे ५ कोटी रुपयांचा कॉर्पस असायला हवा. यामुळे तुम्हाला वार्षिक ५ टक्के दरानं सुमारे २५ लाख रुपयांचं व्याज मिळणार आहे.

जेव्हा तुम्ही निवृत्त व्हाल तेव्हा तुमच्याकडे दोन पर्याय असतील. एकतर तुम्ही तुमचे सर्व पैसे अॅन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवा आणि त्यातून पेन्शन घेण्यास सुरुवात करा. नाहीतर ६० टक्के रक्कम काढून उरलेल्या ४० टक्के रकमेतून अॅन्युइटी प्लॅन बनवा. निवृत्तीनंतर एनपीएसच्या किमान ४० टक्के रक्कम अॅन्युइटी योजनेत गुंतवावी लागते. आपण आपला संपूर्ण रक्कम अॅन्युइटी योजनेत गुंतवून त्यावर पेन्शन मिळवा असं आम्ही गृहित धरत आहोत. अशा प्रकारे आपलं उद्दिष्ट पूर्ण करता येते.

जर तुमचे वय आता ३० वर्षे असेल आणि निवृत्तीनंतर ५ कोटी रुपयांचा निधी उभारायचा असेल तर आधी तुम्हाला किती व्याज मिळू शकतं हे समजून घेतलं पाहिजे. एनपीएसवर सरासरी १० टक्के व्याज सहज मिळतं. त्यामुळे जर तुम्ही दरमहा एनपीएसमध्ये सुमारे २२,१५० रुपये गुंतवले तर ३० वर्षांत तुमचे पैसे वार्षिक १० टक्के व्याजाने सुमारे ५ कोटी रुपये होतील. कंपाउंडिंगमुळे हे शक्य होणार आहे. या ३० वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक सुमारे ७९.७४ लाख रुपये असेल. तर तुम्हाला जवळपास ४.२१ कोटी रुपयांचं व्याज मिळणार आहे.

जर तुम्ही दरमहा एनपीएसमध्ये फक्त ८००० रुपयांपासून सुरुवात केली आणि दरवर्षी गुंतवलेल्या रकमेत १०% वाढ केली तर, ३० वर्षांत तुमचे पैसे वार्षिक १०% व्याज दरानं सुमारे ५.१३ कोटी रुपये होतील. या ३० वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक सुमारे १.५८ कोटी रुपये असेल. तर तुम्हाला जवळपास ३.५५ कोटी रुपयांचं व्याज मिळणार आहे. या पद्धतीत तुमची एकूण गुंतवणूक जास्त असेल, पण सुरुवातीला तुमच्यावरील गुंतवणुकीचा बोजा कमी असेल. त्याचबरोबर तुमचा पगार किंवा कमाई दरवर्षी वाढेल, ज्याच्या मदतीनं तुम्ही गुंतवणुकीत सहज वाढ करू शकता. (टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा सल्ला नक्की घ्या.)