खेडेगावातून आलेल्या तरुणानं उभं केलं साम्राज्य; अमेरिकेतील सर्वात श्रीमंत भारतीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 07:59 IST2025-01-18T07:55:15+5:302025-01-18T07:59:18+5:30

हिमाचल प्रदेशच्या एका छोट्या गावातून पुढे आलेले जय चौधरी आज अमेरिकेतली सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक आहेत. कधी वीज, पाण्यासाठी संघर्ष करणारे जय चौधरी आज त्यांच्याकडे ११.७ अब्ज डॉलर्स (सुमारे १,०१,३०० कोटी रुपये) किंमतीची मालमत्ता आहे. आयआयटी बीएचयूमधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींगमध्ये पदवीचं शिक्षण घेतले.

१९८० साली जय चौधरी अमेरिकेत गेले होते. त्याठिकाणी यूनिवर्सिटी ऑफ सिनसिनाटीतून इंजिनिअरींग आणि मार्केटिंगमध्ये मास्टर डिग्री घेतली. अमेरिकेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ आयटी आणि सायबर सिक्युरिटी क्षेत्रात काम केले. त्यांनी 'Netscreen Technologies' आणि 'CipherTrust' यांसारख्या कंपन्यांत महत्त्वाची भूमिका बजावली. पण त्यांचे ध्येय काहीतरी मोठे आणि वेगळे होते.

सायबर क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर जय चौधरी यांनी सायबर सिक्युरिटी कंपनी Zscaler कंपनीची स्थापना केली. त्यांच्या या कंपनीने इंटरनेटच्या वापराला सुरक्षित बनवण्यावर लक्ष केंद्रित केले. या व्यवसायाला चांगलं यश मिळालं आणि ते अब्जाधीश झाले. त्यांनी अमेरिकेतील सायबर सिक्युरिटी क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.

जय चौधरी यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेले. त्यांनी आठवीपर्यंत गावात शिक्षण घेतले. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या त्याच्या पनोह गावात वीज नव्हती. त्यांच्या गावात दहावीपर्यंत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. एका लहान शेतकरी कुटुंबात जन्मलेला जय हा तीन भावांमध्ये सर्वात लहान होता.

घरची हलाखीची परिस्थिती असतानाही जय यांनी कधी हार मानली नाही आणि शिक्षणाचे महत्त्व समजून घेतले. आयआयटी-बीएचयूमधून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर ते १९८० मध्ये चांगल्या भविष्याच्या शोधात अमेरिकेत गेले. अमेरिकेत जय चौधरी यांनी त्यांचे शिक्षण सुरू ठेवले आणि सिनसिनाटी विद्यापीठातून अभियांत्रिकी आणि मार्केटिंग विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.

जय चौधरी यांचा व्यवसायिक प्रवास १९९६ मध्ये सुरू झाला. जय आणि त्यांची पत्नी ज्योती यांनी नोकरी सोडली. या दोघांनी त्यांच्या आयुष्यातील सुमारे ५००,००० डॉलर बचतीची रक्कम त्यांच्या पहिल्या सायबरसुरक्षा स्टार्टअप फर्म सिक्युअर आयटी मध्ये गुंतवली. हे एक असं पाऊल होते ज्यानं तंत्रज्ञान उद्योगात बदल घडवून आणला.

जय चौधरी यांचं सर्वात मोठे यश म्हणजे Zscaler. ही क्लाउड सुरक्षा उपायांमध्ये विशेषज्ञता असलेली एक आघाडीची सायबर सुरक्षा फर्म आहे. जय चौधरी यांच्या नेतृत्वात Zscaler ने जलद प्रगती केली आणि सध्या ती जगातील आघाडीच्या सायबर सिक्युरिटी कंपन्यांमध्ये गणली जाते

Zscaler ने २०१८ साली IPO आणला आणि त्यानंतर कंपनीचं बाजारमूल्य झपाट्याने वाढला. या कंपनीतील हिस्सेदारीमुळे जय चौधरी यांची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कंपनीने जय चौधरी यांना केवळ यशाच्या शिखरावर नेले नाही तर त्यांना अब्जावधींच्या मालमत्तेचे मालकही बनवले. फोर्ब्सच्या मते, जय चौधरीची एकूण संपत्ती ११.७ अब्ज डॉलर आहे.

जय चौधरीची कहाणी अशा सर्व लोकांसाठी प्रेरणादायी आहे जे कठीण परिस्थितींना तोंड देऊनही आपली स्वप्ने पूर्ण करू इच्छितात. कठोर परिश्रम, समर्पण आणि दृढनिश्चयाने कोणतेही ध्येय साध्य करता येते. प्रतिकूल परिस्थितीतही आपण हिंमत गमावू नये असं त्यांचा प्रवास आपल्याला शिकवतो.

शिक्षणाचे महत्त्व, जोखीम घेण्याचे धाडस आणि चिकाटी ही यशाची गुरुकिल्ली आहे. जय चौधरी ही एका सामान्य खेडेगावातील मुलाची असामान्य कामगिरीची कथा आहे. जय चौधरी हे आज जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी भारतीय उद्योजकांपैकी एक मानले जातात. धैर्य, मेहनत आणि दूरदृष्टी असल्यास कोणताही माणूस यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो हे त्यांनी दाखवून दिले.