Rule Change Form 1 November: महागाईचा भार... खिशाला खार; आजपासून बँक, गॅस सिलिंडरचे नियम बदलले, जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 08:43 AM 2021-11-01T08:43:00+5:30 2021-11-01T08:50:35+5:30
Rule Changed Form today, 1 November 2021: सामान्य नागरिक वाढत्या महागाईने गांजून गेले असताना आज, १ नोव्हेंबरपासून ग्राहकांच्या खिशाला आणखी खार लागेल, अशी ‘तजवीज’ आहे. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे स्पष्ट संकेत असताना सामान्यजन दिवाळीच्या खरेदीसाठी उत्साहात बाहेर पडले आहेत. सर्वत्र दीपोत्सवाचा माहोल आहे. गरिबातील गरीबही दिवाळी साजरी करण्यासाठी उत्सुक आहे. असे सर्व असताना इंधनाचे दरही दररोज नित्यनवे उच्चांक गाठत आहे.
नुकत्याच सरलेल्या ऑक्टोबर महिन्यात तर तब्बल २० वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ झाली. त्यामुळे सर्वसामांन्यांसाठी जीवनावश्यक असलेल्या वस्तूंच्या किमतीही हळूहळू वाढू लागल्या आहेत. एकीकडे सामान्य नागरिक वाढत्या महागाईने गांजून गेले असताना आज, १ नोव्हेंबरपासून ग्राहकांच्या खिशाला आणखी खार लागेल, अशी ‘तजवीज’ आहे.
गॅस दरवाढीची ‘दिवाळी भेट’ पेट्रोलियम कंपन्यांकडून दर महिन्याच्या १ तारखेला स्वयंपाकाच्या गॅसचे नवे दर जाहीर होतात. गेल्या काही महिन्यांपासून सिलिंडरच्या किमती वाढतच गेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना सिलिंडरच्या वाढीव रकमेची ‘दिवाळी भेट’ मिळाली आहे. एलपीजी सिलिंडर 265 रुपयांनी महागला आहे.
सिलिंडर बुक करताना काळजी घ्या १ नोव्हेंबरपासून गॅस सिलिंडरच्या डिलिव्हरीसाठी ओटीपी लागणार आहे. गॅस सिलिंडरचे बुकिंग केल्यावर ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी पाठविला जाईल. डिलिव्हरी करणाऱ्याला ओटीपी दिल्यानंतरच गॅस सिलिंडर दिले जाणार आहे. चुकीचा पत्ता आणि मोबाइल नंबर देणाऱ्यांना असे करणे महागात पडू शकेल.
रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल रेल्वेतर्फे १ नोव्हेंबरपासून वेळापत्रकामध्ये बदल केला जाणार आहे. याआधी हा बदल १ ऑक्टोबरपासून होणार होता. १३ हजार प्रवासी गाड्या, ७ हजार मालगाड्या आणि ३० राजधानी एक्स्प्रेसच्या वेळांमध्ये बदल केला जाणार आहे.
स्थानकांवरील गर्दी कमी करण्याच्या रेल्वेने तीन आठवड्यांपूर्वी काही ठरावीक रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकिटाच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. १० रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट या स्टेशनवर आता ५० रुपये करण्यात आले आहे. याशिवाय मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंडही आकारला जाईल.
बँकेत पैसे भरणे आणि काढण्यावर शुल्क बँक ऑफ बडोदाने १ नोव्हेंबरपासून बचत खात्यात महिन्यातून तीनपेक्षा अधिक वेळा रक्कम भरल्यास त्यावर शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ४० रुपये प्रति व्यवहार असे शुल्क आकारले जाणार आहे. मात्र जनधन खात्यांना यामधून सूट देण्यात आली आहे.
ठरावीक व्यवहारांपेक्षा अधिक वेळा रक्कम काढल्यास त्यावरही शुल्क लागू होणार आहे. याशिवाय ग्राहकांना कर्ज खात्यासाठी आजपासून १५० रुपये भरावे लागणार आहेत.
व्हाॅट्सॲप बंद होणार? आयफोनचे बरेच व्हर्जन आणि काही अँड्रॉईड फोनवर आजपासून व्हॉट्सॲप चालणार नाही. फेसबुकच्या मालकीचे प्लॅटफॉर्म अँड्रॉइड ४.०.३, आयसीएस, आयओएस ९ आणि केएआयओएस २.५.० ला व्हॉट्सॲप सपोर्ट करणार नाही.