बँकिंग, इन्कम टॅक्सपासून गुगलपर्यंत, १ जूनपासून बदलणार हे नियम, दैनंदिन व्यवहारांवर होणार असा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 12:46 PM2021-05-28T12:46:09+5:302021-05-28T12:58:49+5:30

Rule Changes From June 2021: येत्या १ जूनपासून दैनंदिन व्यवहारांमधील विविध नियमांमध्ये बदल होणार आहे. यामध्ये बँकिंग, इन्कम टॅक्स, गॅस सिलेंडर, चेक पेमेंटपासून ते गुगलपर्यंतच्या नियमांचा समावेश आहे. या बदलांचा तुमच्या दैनंदिन व्यवहारांवर थेट परिणाम होणार आहे. १ जूनपासून होणारे हे बदल पुढीलप्रमाणे आहेत.

येत्या १ जूनपासून दैनंदिन व्यवहारांमधील विविध नियमांमध्ये बदल होणार आहे. यामध्ये बँकिंग, इन्कम टॅक्स, गॅस सिलेंडर, चेक पेमेंटपासून ते गुगलपर्यंतच्या नियमांचा समावेश आहे. या बदलांचा तुमच्या दैनंदिन व्यवहारांवर थेट परिणाम होणार आहे. १ जूनपासून होणारे हे बदल पुढीलप्रमाणे आहेत.

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करणाऱ्यांसाठी खास बातमी आहे. ७ जून रोजी इन्कम टॅक्सची नवी वेबसाईट लाँच होणार आहे. त्यामुळे १ ते ६ जूनदरम्यान, करदात्यांना इन्कम टॅक्स विभागाच्या जुन्या वेबसाईटचा वापर करता येणार नाही. या सहा दिवसांच्या काळात वेबसाईटमध्ये बदलांची प्रक्रिया सुरू राहील. नवी वेबसाईट आल्यानंतर आयटीआर दाखल करण्याची पद्धत आणि अनुभव पूर्णपणे बदलून जाईल. नव्या साईटमध्ये अॅडव्हान्स फिचर्स असतील. त्यामुळे आयटीआर फाईल करणे सोपे होईल.

सरकारकडून दर तीन महिन्यांनी अल्पबचत योजनांच्या व्याजदरात बदल करण्यात येतो. याबाबत सरकार समीक्षा करते. गेल्यावेळी सरकारने याच्या व्याजदरात कपात केली होती. मात्र विरोध झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. अशा परिस्थितीत यावेळी जर व्याजदरात कपात केली गेली तर ईपीएफ, एनएससी, सुकन्या समृद्धी योजनेसह अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना धक्का बसू शकतो.

सध्या एलपीजी सिलेंडर ८०९ रुपयांना मिळत आहे. या दरात १ जूनरोजी बदल होणार आहे. तेल कंपन्या दर महिन्याला एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल करतात.

१ जूनपासून चेक पेमेंटच्या पद्धतीत बदल होणार आहे. हा बदल सध्यातरी बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी लागू आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशनचा नियम अनिवार्य केला आहे. त्यामाध्यमातून चेकसंबंधीच्या गडबडींपासून वाचता येईल. जेव्हा ग्राहक कुणालाही चेक जारी करेल तेव्हा बँक ग्राहक चेकची संपूर्ण माहिती घेईल. या क्रॉस चेकिंगदरम्यान जर काही गडबड झाली तर त्या चेकला रिजेक्ट करण्यात येईल.

आता तुम्ही पूर्वीप्रमाणे गुगल फोटोमध्ये अनलिमिटेड फोटो अपलोड करू शकणार नाही. गुगल स्टोरेज पॉलिसीमध्ये १ जूनपासून मोठा बदल होणार आहे. यापूर्वी गुगल ड्राइव्हमध्ये २५ जीबी स्पेस दिला जात असे. मात्र आता गुगलने यात कपात केली आहे. आता एकूण १५ जीबी स्पेस दिली जाईल. ज्यामध्ये ईमेल, गुगल ड्राइव्ह, गुगल फोटो या सर्वांचा समावेश असेल. मात्र अधिक स्पेस वापरायची असल्यास त्यासाठी पैसे मोजावे लागतील.

कॅनरा आणि सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना आयएफएससी कोड ३० जूनपर्यंत अपडेट करावा लागेल. सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेमध्ये विलिनीकरण झाले आहे. यापूर्वी सिंडिकेट बँकेचा आयएफएससी कोड हा SYNB या नावाने सुरू होई. मात्र आता हा कोड ३० जूननंतर अमान्य होणार आहे. त्यामुळे तुम्हाला याआधी बँकेत जाऊन आयएफएससी कोड अपडेट करावा लागेल.

गोल्ड हॉलमार्किंगचे नियम १५ जूनपासून बदलणार आहेत. मात्र हा बदल १ जूनपासून होणार होता. आतापर्यंत सरकारने या नियमांना पाचवेळा स्थगिती दिली आहे. हे नियम लागू करण्याची घोषणा केंद्र सरकारने २०१९ मध्ये केली होती. त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये हा नियम लागू करण्याबाबत चर्चा सुरू होती.