१ ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर होणार असा परिणाम By बाळकृष्ण परब | Published: September 28, 2020 01:19 PM 2020-09-28T13:19:02+5:30 2020-09-28T15:20:59+5:30
येत्या १ ऑक्टोबरपासून दैनंदिन व्यवहारातील अनेक गोष्टींबाबतचे महत्त्वपूर्ण नियम बदलणार आहेत. यापैकी काही बदलांचा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. १ ऑक्टोबरपासून दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींबाबतचे महत्त्वपूर्ण नियम बदलणार आहेत. यापैकी काही बदलांचा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. यामध्ये गॅसच्या किमती, आरोग्य विमा, परदेशात पैसे पाठवण्यावरील टीसीए आदींचा समावेश आहे. त्यामुळे आज आपण जाऊन घेऊयात येत्या १ तारखेपासून होणाऱ्या दैनंदिन व्यवहारात होणाऱ्या काही महत्त्वाच्या बदलांविषयी.
उत्तर भारतात वापरल्या जाणाऱ्या मोहरीच्या तेलाबाबत फूट रेग्युलेटर एफएसएसएआय म्हणजेच भारतीय अन्नसुरक्षा आणि मानांकन प्राधिकरणाने (FSSAI-Food Safety and Standards Authority of India) नवे नियम जारी केले आहेत. या नियमांनुसार आता मोहरीच्या तेलाची अन्य कुठल्या खाद्य तेलासोबत मिश्रण करण्यावर १ ऑक्टोबरपासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात भारतीय अन्न आणि मानांकन प्राधिकरणाने म्हटले आहे की, भारतामध्ये कुठल्याही अन्य खाद्य तेलासोबत मोहरीच्या तेलाचे मिश्रण करण्यावर १ ऑक्टोबर २०२० पासून बंदी असेल.
तसेच सरकारने स्थानिक दुकानांवरील, आसपास असणाऱ्या मिठाईच्या दुकानांवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबर २०२० नंतर स्थानिक मिठाईच्या दुकांनामध्येसुद्धा डब्यामध्ये बंद करून विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईची उत्पादनाची आणि खाण्यास योग्य असल्याचा कालावधी द्यावा लागेल. हे विवरण आधीपासून बंद असलेल्या डबाबंद मिठाईच्या डब्यावर उल्लेखित करणे अनिवार्य आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानेदेखील मोटार वाहन नियमांमध्ये बदल केल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार आता १ ऑक्टोबरपासून वाहनासंबंधीची आवश्यक कागदपत्रे लायसन्स, रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स, फिटनेस सर्टिफिकेट,परमिट्स आदींना सरकारकडून संचालित वेबपोर्टलच्या माध्यमातून मेटेंन करता येईल. इलेक्ट्रॉनिक पोर्टलच्या माध्यमातून कम्पाऊंडिंग, इम्पाऊंडिंग, एंडॉर्समेंट, लायसन्सचे सस्पेंशन आणि रिव्होकेशन, रजिस्ट्रेशन आणि ई-चलन जारी करण्यासारखी कामेही करता येतील. मोटार वाहन संशोधन कायद्यांतर्गत असलेल्या या नियमांना १ ऑक्टोबरपासून लागू करण्यात येईल.
केंद्र सरकारने परदेशात पैसे पाठवण्यावर लावण्यात येणाऱ्या कराबाबतच्या नव्या नियमामध्येसुद्धा बदल केला आहे. हा नियम १ ऑक्टोबर २०२० पासून लागू होईल. अशा परिस्थितीत जर तुम्ही परदेशात शिकत असलेल्या आपल्या मुलाला पैसे पाठवले किंवा कुठल्या नातेवाईकाला आर्थिक मदत केली. तर या रकमेवर तम्हाला ५ टक्के टॅक्स कलेक्टेड अॅट सोर्स (टीसीएस) अतिरिक्त द्यावा लागेल. फायनान्स अॅक्ट २०२० नुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या लिबरलाइझ रेमिटेन्स स्कीम अंतर्गत परदेशात पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीला टीसीएस द्यावे लागेल. एलआरएस अंतर्गत २.५ लाख डॉलर प्रतिवर्षी पाठवण्याची मुभा आहे. यावर कुठलाही कर आकारला जात नाही. यालाच कराच्या चौकटी आणण्यासाठी टीसीएस द्यावा लागेल.
१ ऑक्टोबरपासून केंद्र सरकारने ओपन सेल च्या आयातीवर असलेल्या ५ टक्के कस्टम ड्युटीला देण्यात आलेली सवलत हटवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे टीव्ही खरेदी करणे महाग होऊ शकते. कलर टीव्हीसाठी ओपन सेल सर्वात महत्त्वाचा भाग असतो. आता ओपन सेलवरील आयात शुल्कामुळे देशातील टेलिव्हिजनच्या निर्मितीवर परिणाम होऊ शकतो.
विमा नियामक संस्था असलेल्या आयआरडीएच्या नियमांतर्गत विमा पॉलिसीमध्ये एक मोठा बदल होणार आहे. १ ऑक्टोबरपासून सर्व चालू आणि नव्या आरोग्य विमा पॉलिसींमध्ये किफायती दरांमध्ये अधिकाधिक आजारांवरील कव्हर उपलब्ध होईल. हा बदल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींना स्टँडराइज्ड आणि कस्टमर सेंट्रिक बनवण्यासाठी करण्यात आला आहे. यामध्ये अन्य काही बदलांचाही समावेश आहे.
दर महिन्याच्या सुरुवातील सरकारी कंपन्या घरगुती वापराचा गॅस आणि नैसर्गिक गॅसच्या किमती निर्धारित करत असतात. गेल्या महिन्यात १४.२ किलोग्रॅम आणि १९ किलोग्रॅम वाल्या गॅस सिलेंडरच्या किमती घटवण्यात आल्या होत्या. आत ऑक्टोबरमध्येही या किमतीत घट होण्याची शक्यता आहे.