Rupee all time low : दोन वर्षांमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया पार धारातीर्थी, आपल्यावर काय परिणाम होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 09:30 AM2022-07-16T09:30:22+5:302022-07-16T09:39:07+5:30

गेल्या दोन वर्षांमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया पार धारातीर्थी होऊन पडला असून, तो आता डॉलरच्या तुलनेत ८० च्या जवळपास आला आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया पार धारातीर्थी होऊन पडला असून, तो आता डॉलरच्या तुलनेत ८० च्या जवळपास आला आहे. त्यामुळे आयात महाग होऊन त्याचा थेट फटका नागरिकांना बसणार आहे. रुपयाची पत ढासळल्यामुळे कच्च्या तेलाची आयात, इलेक्ट्रॉनिक वस्तू, परदेशी शिक्षण आणि विदेशी प्रवास महाग होणार आहे. अन्य नेमके काय परिणाम होणार हे जाणून घेऊ...

पेट्रोल, डिझेल किमतींचे काय? - रुपयाचे अवमूल्यनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड प्रमाणात कमी झालेल्या इंधनाच्या किमतीचा फायदा भारताला म्हणाव्या तितक्या प्रमाणात मिळणार नाही.

पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधन यांसारख्या इंधनाच्या गरजा भागवण्यासाठी भारत ८५ टक्के परदेशी तेलावर अवलंबून आहे. त्यामुळे रुपयाच्या घसरणीचा मोठा परिणाम तेल आयातीवर होतो. यामुळे पेट्रोल, डिझेल स्वस्त होण्याची शक्यता मावळते.

आयात का वाढतेय? - ताज्या आकडेवारीनुसार, देशाची आयात जूनमध्ये तब्बल ५७.५५ टक्क्यांनी वाढून ६६.३१ अब्ज डॉलरवर गेली आहे. तर निर्यात २३.५२ टक्क्यांनी वाढून केवळ ४०.१३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. ही व्यापारी तूट जून २०२१ च्या तुलनेत (९.६० अब्ज डॉलर) च्या तुलनेत २६.१८ अब्ज इतकी वाढली आहे. ही वाढ तब्बल १७२.७२ टक्क्यांनी आहे. हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठा धोका असल्याचे मानले जात आहे.

खाद्य तेलासह सर्व वस्तूंच्या आयातीचा खर्च वाढेल. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती घसरत असल्या, तरीही रुपया घसरत असल्याने खाद्य तेल महागच मिळेल. ऑक्टोबरमध्ये संपलेल्या २०२०-२१ या तेल वर्षात भारताने १.१७ लाख कोटी रुपयांचे विक्रमी खाद्यतेल आयात केले आहे, अशी प्रतिक्रिया सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे कार्यकारी संचालक बी.व्ही. मेहता यांनी दिली.

पहिला परिणाम कुणावर? - घसरणाऱ्या रुपयाचा सर्वांत पहिला परिणाम हा आयातदारांवर होतो. त्यामुळे त्यांना त्याच प्रमाणात आणि किमतीसाठी अधिक पैसे द्यावे लागतील. मात्र, निर्यातदारांना डॉलरच्या बदल्यात अधिक रुपये मिळत असल्याने त्यांना फायदा होणार आहे.

२१.३ अब्ज डॉलर किमतीचे कच्चे तेल जूनमध्ये आयात करण्यात आले. हे प्रमाण जवळपास दुप्पट आहे. २१.३ अब्ज डॉलर किमतीचे कच्चे तेल जूनमध्ये आयात करण्यात आले. हे प्रमाण जवळपास दुप्पट आहे. ६.७६ अब्ज डॉलर किमतीचे कोळसा व कोक आयात करण्यात आली असून, ही वाढ ही वाढही दुप्पट आहे.