तुमचेही एकापेक्षा अधिक सेविंग अकाऊंट्स आहेत? फायदे अन् तोटे काय? जाणून घ्या.. By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 07:43 PM 2022-02-18T19:43:36+5:30 2022-02-18T20:05:14+5:30
सध्याच्या जमान्यात प्रत्येकाचं किमान एक सेविंग अकाऊंट्स असतंच. पण अनेकांकडे एकापेक्षा अधिक सेविंग अकाऊंट्स असतात. एकापेक्षा अधिक सेविंग अकाऊंट्स बाळगणं फायद्याचं आहे का? जाणून घेऊयात... तुम्ही जर खासगी कंपनीचे कर्मचारी असाल तर आतापर्यंत जितके जॉब तुम्ही बदलता तेव्हा नव्या कंपनीत नव्या बँकेत तुम्हाला खातं उघडावं लागतं. पण एकापेक्षा अधिक बचत खाती असणं फायदेशीर आहे का? याचे काही तोटे आहेत का? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर याची माहिती आपण जाणून घेऊयात.
निष्क्रीय होऊ शकतं खातं एकापेक्षा अधिक बचत खाती असल्याचा पहिला तोटा म्हणजे एकाचवेळी अनेक खाती सक्रिय ठेवणं खूप कठीण होऊन बसतं. बचत खात्यांमध्ये किमान रक्कम ठेवणं खूप गरजेचं असतं. तुम्ही तुमचं बचत खातं बऱ्याच कालावधीपासून वापरलं नाही तर ते निष्क्रिय होऊ शकतं. असं बऱ्याचदा नोकरदार वर्गासोबत होतं. जेव्हा एखादा व्यक्ती नव्या कंपनीत जातो तेव्हा जुन्या बँकेचं खातं पूर्णपणे निष्क्रीय होतं.
सिबिल स्कोअरवर परिणाम जेव्हा तुमचं बँक खातं सक्रिय ठेवू शकत नाही आणि पेनल्टी लागते त्यावेळी तुमच्या सिबिल स्कोअरवरही परिणाम होतो. एखाद्या खात्यावर लागलेली पेनल्टी जेव्हा तुम्ही जमा करत नाही आणि त्यात भर पडत जाते. यामुळे खातेधारकाच्या सिबिल स्कोअरवर परिणाम होतो.
सेवा कराचा अतिरिक्त भार बँक खात्यातून वेगवेगळ्या प्रकारचे सेवा कर आकारले जातात. जसं की SMS अलर्ट चार्ज, डेबिट कार्ड चार्ज इत्यादी. जर तुमचे एकापेक्षा अधिक बचत खाती असतील तर तुम्हाला प्रत्येक खात्यासाठी सेवा कर भरावा लागतो.
गुंतवणुकीवर परिणाम सध्या अनेक बँका खातेधारकांना बचत खात्यात किमान २० हजार रुपयांची रक्कम ठेवण्यास सांगतात. जर तुमच्याकडे चार बचत खाती असतील तर तुम्हाला सर्व खात्यांचे मिळून ८० हजार रुपये खात्यात ठेवावे लागतील. त्यामुळे एखाद्या ठिकाणी तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर पैसे वापरता येत नाहीत.
इन्कम टॅक्स फ्रॉड बचत खात्यातील १० रुपयांपर्यंतच्या व्याजावर कर माफ असतो. या सीमेनंतरच्या व्याजावर टीडीएस कापला जातो. त्यामुळे तुम्ही जेव्हा बचत खात्यात मिळालेल्या १० हजार रुपयांच्या व्याजावरील टॅक्स फ्रीची मर्यादा ओलांडत असाल आणि यासाठी तुम्ही एकापेक्षा अनेक खात्यांमध्ये रोख जमा करत असाल तर हा इन्कम टॅक्स फ्रॉड ठरू शकतो.
व्याजाचं नुकसान एकापेक्षा अनेक खात्यांमध्ये पैसे ठेवल्यानं तुम्हाला मिळणाऱ्या व्याजात मोठं नुकसान तुम्हाला होऊ शकतं. अनेक बँका खात्यात जितकी जास्त रक्कम तितकं जास्त व्याज ग्राहकांना देत असतात. पण तुमची एकापेक्षा अधिक खाती बाळगण्यापेक्षा एकाच खात्यात सर्व रक्कम ठेवल्यास जास्तीत जास्त व्याज मिळवू शकता.
ITR भरताना त्रासदायक आयकर भरताना तुम्हाला तुमच्या सर्व बँक खात्यांची माहिती द्यावी लागते. तुमच्याकडे एकापेक्षा अधिक बचत खाती असतील तर प्रत्येक खात्याची बँक स्टेटमेंट जमा करणं खूप त्रासदायक ठरतं. एखाद्या बँकेनं तुम्हाला बँक स्टेटमेंट देण्यास नकार दिला तर इन्कम टॅक्स विभागाची नोटीस येऊ शकते.
विविध लक्ष्य प्राप्तीसाठी अधिक खाती फायदेशीर जर तुम्ही घर, कार, लग्न आणि उच्च शिक्षण इत्यादीसाठी बचत करत असाल तर लक्ष्य प्राप्तीसाठी वेगवेगळ्या उद्दीष्टांसाठी वेगवेगळी खाती असणं फायदेशीर ठरू शकतं. प्रत्येक लक्ष्याच्या दृष्टीनं बँक खात्यात बचत करू शकता.
लिक्विडिटी एकापेक्षा अनेक बचत खात्यांचा मोठा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या बँक खात्यांपैकी कधीही कुठेही पैसे काढू शकता. ज्या बँकेचं एटीएम तुम्हाला जवळ दिसेल त्या खात्याचं एटीएम कार्ड वापरुन रक्कम काढू शकता. त्यामुळे एकापेक्षा अधिक बचत खाती असण्याचा हा फायदा ठरू शकतो.