सेव्हिंग आणि सॅलरी अकाऊंटमध्ये फरक काय? फायदे बँकाही सांगत नाहीत, १० टक्के लोकांनाच माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 04:52 PM2023-04-19T16:52:10+5:302023-04-19T17:04:54+5:30

सेव्हिंग अकाऊंट वि. सॅलरी अकाऊंट: फायदे फक्त १० टक्के लोकांनाच माहिती, पगार घेणारे देखील अनभिज्ञ...तुम्ही जाणून घ्या... बँका घालतील पायघड्या

एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय सारख्या बँकांमध्ये सॅलरी अकाऊंट असलेल्यांची चांदी असते. कर्ज झटकीपट मंजूर होते, क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन अशा अनेक सुविधा मिळतात. परंतू त्या सेव्हिंग अकाऊंट असलेल्यांना मिळता मिळत नाहीत. हाच प्रकार अन्य बँकांबाबतही असतो.

तुम्हाला सॅलरी अकाऊंट आणि सेव्हिंग अकाऊंटमधील फरक माहिती असेलच. ज्यांना त्यांची कंपनी टायअप असलेल्या बँकेत अकाऊंट खोलून देते, व त्या खात्यात दर महिन्याचा पगार, बोनस वळता केला जातो त्याला सॅलरी अकाऊंट म्हणतात.

या सॅलरी अकाऊंटचे अनेक फायदे असतात. नेहमीचे सेव्हिंग अकाऊंट वेगळे असते. यामध्ये सॅलरी अकाऊंटसारखे फायदे मिळत नाहीत. जाणून घ्या सॅलरी अकाऊंट असेल तर बँका काय काय देतात. तुम्हाला सांगत नाहीत यामुळे १० टक्के लोकांनाच सॅलरी अकाऊंटचे फायदे माहिती असतात.

सॅलरी अकाऊंटला झिरो बॅलन्सची सुविधा मिळते. जी अन्य बँकांमध्ये शहरांनुसार असते. सॅलरी अकाऊंटला मिनिमम बॅलन्स मेन्टेन करण्याची गरज नाही. रेग्युलर अकाऊंटला मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड भरावा लागतो.

सॅलरी अकाऊंटवाल्यांना महिन्याला कितीही वेळा एटीएमद्वारे पैसे काढले तरी शुल्क लागत नाही. याचबरोबर बँका सॅलरी अकाऊंट असेल तर एटीएमचे वार्षिक शुल्क देखील आकारत नाहीत. परंतू सेव्हिंग असेल तर पाच पेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर शुल्क आणि वर्षाची फी सुद्धा द्यावी लागते.

पगाराच्या खात्यावर वैयक्तिक कर्जाशी संबंधित विशेष ऑफर देखील उपलब्ध असतात. याशिवाय अनेक प्री अॅप्रुव्हड लोन देखील मिळतात. गृह आणि वाहन कर्जासाठी विशेष ऑफर उपलब्ध असतात. सेव्हिंगवर सतराशे साठ कागदपत्रे दिली तरी कर्ज घेताना अडचणी येतात. व्याजही जास्त आकारले जाते.

पगाराच्या खात्यावर ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध असते. ही सुविधा 2 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी झालेल्या खात्यांवर उपलब्ध आहे. या सुविधेअंतर्गत, तुमच्या बँक खात्यात शिल्लक नसली तरीही, तुम्ही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पैसे काढू शकता.

अनेक बँका त्यांच्या सॅलरी खातेधारकांना मोफत चेकबुक, पासबुक आणि ई-स्टेटमेंट सुविधा देतात. त्याच वेळी, एसएमएस अलर्टसाठी कोणतेही शुल्क कापत नाहीत.

सॅलरी खाते असेल तर खातेधारकांना बँकांकडून 20 लाख रुपयांपर्यंतचा वैयक्तिक अपघात विमा मिळतो.

काही बँका त्यांच्या ग्राहकांना पगार खात्यावर मोफत ऑनलाइन व्यवहाराची सुविधा देतात. या अंतर्गत, NEFT आणि RTGS ची सुविधा सामान्यतः विनामूल्य असते. अनेक बँका पगार खात्यावर IMPS सुविधा देखील देतात.

वरील सर्व सुविधा या बँकांनुसार कमी अधिक किंवा सवलतीच्या दरात उपलब्ध असतात. यासाठी तुम्ही तुमची कंपनी सहकारी, बँकांमध्ये चौकशी करावी.