SBI, ICICI, PNB आणि Bank of Baroda यांनी नियमात केले मोठे बदल; खिशावर 'असा' होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 04:46 PM2022-02-03T16:46:32+5:302022-02-03T17:03:27+5:30

SBI, ICICI, PNB And Bank of Baroda : बँकांनी याबाबत आपल्या खातेदारांना सूचना देखील दिली आहे. खातेदारांना या नियमांकडे विशेष लक्ष देण्यास सांगितलं आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि बँक ऑफ बडोदा (BoB) या बँकेच्या ग्राहकांसाठी आता महत्त्वाची माहिती आहे. या बँकांनी आपले काही नियम बदलले आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि बँक ऑफ बडोदा या तीन बँकांचे नियम 1 फेब्रुवारी 2022 पासून बँक खातेधारकांना लागू झाले आहेत. आयसीआयसीआय या एका बँकेचे नियम 10 फेब्रुवारीपासून लागू होतील.

बँकांनी याबाबत आपल्या खातेदारांना सूचना देखील दिली आहे. खातेदारांना या नियमांकडे विशेष लक्ष देण्यास सांगितलं आहे. नियम माहीत नसल्यास ग्राहकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. या मोठ्या बदलांबाबत जाणून घेऊया....

तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank of India) ग्राहक असाल, तर आता तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. SBI च्या वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे.

बँकेने 1 फेब्रुवारी 2022 पासून आयएमपीएस व्यवहारांमध्ये (IMPS) एक स्लॅब जोडला आहे. हा स्लॅब 2 ते 5 लाख रुपयांपर्यंत आहे. आता 2 ते 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम शाखेतून IMPS द्वारे पाठवल्यानंतर त्यावर 20 रुपये शुल्क आणि GST आकारला जाईल.

आयसीआयसीआय बँकेने आपल्या नियमांमध्ये बदल केला आहे. ICICI बँकेने केलेले बदल 10 फेब्रुवारीपासून लागू होतील. क्रेडिट कार्डचं बिल वेळेवर न भरल्यास विलंब शुल्क वाढवण्यात आलं आहे. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड ग्राहकांना प्रत्येक व्यवहारासाठी 2.50 टक्के व्यवहार शुल्क भरावं लागणार आहे.

चेक किंवा ऑटो डेबिट रिटर्न असेल तर ग्राहकांना संपूर्ण रकमेवर 2 टक्के शुल्क भरावं लागेल. तसंच ग्राहकाच्या बचत खात्यातून 50 रुपये आणि जीएसटीही कापला जाईल. हे शुल्क किमान 500 रुपयांच्या व्यवहारांवर लागू होईल.

बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda rules changing) खातं असलेल्या ग्राहकांसाठी 1 फेब्रुवारीपासून मोठा बदल झाला आहे. बँकेने चेक क्लिअरन्सशी (Cheque Clearance Rule) संबंधित नियम बदलले आहेत.

बँकेने ग्राहकांना सूचित केलं आहे, की चेक पेमेंटसाठी ग्राहकांना पॉझिटिव्ह पे सिस्टीम फॉलो (Positive Pay System) करावी लागणार आहे. आता ग्राहकांना चेक दिल्यानंतर त्या चेकशी संबंधित माहिती बँकेला पाठवावी लागणार आहे. तसं न केल्यास चेक परत केला जाऊ शकतो.

हे नियम 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकवर लागू होतील. ही माहिती SMS, मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग आणि एटीएमद्वारे (ATM) दिली जाऊ शकते. 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकसाठी हा नियम आहे.

10 लाखांपेक्षा कमी रकमेचा चेक असेल, तर ही प्रकिया फॉलो करण्याची गरज नाही. आपल्या ग्राहकांचा फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी हा नवीन नियम जारी करण्यात आला आहे. हा नियम अनेक बँकांनी लागू केला आहे. तसंच SBI योनो अॅपद्वारे केलेल्या IMPS वर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही.

पंजाब नॅशनल बँकेनेही आपल्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. हे नियम 1 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. तुमच्या खात्यात पैसे नसतील आणि त्यामुळे तुमचा हप्ता किंवा गुंतवणूक डेबिट अयशस्वी झालं, तर तुम्हाला 250 रुपये दंड भरावा लागेल.

पंजाब नॅशनल बँकेमध्ये आतापर्यंत दंडाची रक्कम 100 रुपये होती. याशिवाय डिमांड ड्राफ्ट रद्द केल्यास आता 100 ऐवजी 150 रुपये भरावे लागतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.