SBI Rate Hike: झटक्यावर झटका! आणखी खिसा रिकामा करावा लागणार, एसबीआयनं पुन्हा महाग केलं होम लोन By जयदीप दाभोळकर | Published: March 15, 2023 08:12 AM 2023-03-15T08:12:01+5:30 2023-03-15T08:21:41+5:30
आरबीआयनं यापूर्वी रेपो दरात वाढ केली होती. त्यानंतर सर्वच बँकांनी आपल्या ग्राहकांना कर्जाचे व्याजदर वाढवून झटका देण्यास सुरुवात केली आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयने कर्ज पुन्हा एकदा महाग केलं आहे. बँकेनं आपला बेस रेट (Base Rate) आणि बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (BPLR) वाढवला आहे. वाढलेले दर आजपासून म्हणजेच १५ मार्चपासून लागू होतील. बँक तिमाही आधारावर आपला बेस रेट आणि बीपीएलआरमध्ये बदल करते.
बँकेच्या वेबसाइटनुसार, बीपीएलआर आणि बेस रेट दोन्ही ०.७० टक्के म्हणजेच ७० बेसिस पॉइंट्सनं वाढले आहेत. १५ मार्चपासून बँकेचा बीपीएलआर १४.१५ टक्क्यांवरून १४.८५ टक्के झालं आहे.
त्याचप्रमाणे, बेस रेट देखील ९.४० टक्क्यांवरून १०.१० टक्क्यांवर पोहोचला आहे. बेस रेट आणि बीपीएलआरमध्ये वाढ झाल्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. त्यामुळे कर्ज महाग होतील. म्हणजे त्यांचा कर्जाचा हप्ता (EMI) वाढेल.
बेस रेट आणि बीपीएलआर हे बँकेचे जुने बेंचमार्क आहेत ज्यांच्या आधारावर बँक लोकांना कर्ज देते. नवीन कर्ज एक्सटर्नल बेंचमार्क बेस्ड लेंडिंग रेट (EBLR) किंवा रेपो रेट लिंक्ड रेटच्या (RLLR) आधारावर दिली जातात. बेस रेट आणि BPLR मध्ये वाढ केल्यानं ज्यांची कर्जे या बेंचमार्कशी जोडलेली आहेत त्यांच्यासाठी हप्ता वाढेल.
बीपीएलआरची गणना निधीच्या सरासरी खर्चाच्या आधारावर केली जात होती. यामध्ये पारदर्शकतेचा अभाव होता. याच कारणामुळे RBI ने २०१० मध्ये बेस रेट आणला होता.
बेस रेट हा किमान व्याजदर आहे ज्यावर बँका कर्ज देऊ शकतात. यापेक्षा कमी दराने कर्ज देता येत नाही. एप्रिल २०१६ मध्ये, RBI ने बेस रेट ऐवजी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड (MCLR) सादर केले.
MCLR हा वित्तीय संस्थेसाठी अंतर्गत बेंचमार्क आहे. कर्जाचा किमान व्याजदर MCLR प्रक्रियेत निश्चित केला जातो. MCLR हा किमान व्याज दर आहे ज्यावर बँक कर्ज देऊ शकते.
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयनं पुन्हा एकदा कर्ज (SBI interest rate) महाग केलं आहे. एसबीआयनं अलीकडेच MCLR मध्ये सर्व कालावधीसाठी ०.१० टक्क्यांनी वाढ केली होती.
बँकेनं यावर्षी MCLR मध्ये दोनदा वाढ केली आहे. आरबीआयनं अलीकडेच सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. यानंतर अनेक बँकांनी कर्ज महाग केलं.