हिंडनबर्गने आरोप केलेल्या सेबीच्या प्रमुख माधबी बुच, धवल बुच कोण? अचानक आले चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 11:21 AM2024-08-11T11:21:43+5:302024-08-11T11:33:57+5:30

Who is Madhabi puri Buch: या दोघांचा मॉरिशस ऑफशोर कंपनी 'ग्लोबल डायनॅमिक अपॉर्च्युनिटी फंड'मध्ये हिस्सेदारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. आता याचा परिणाम सेबी, शेअर बाजारावर कसा होतो हे उद्या दिसणार आहे

गेल्या वर्षी अदानी समूहावर आर्थिक अनियमिततेचा आरोप करणाऱ्या हिंडेनबर्ग रिसर्च या गुंतवणूक संशोधन कंपनीने शनिवारी सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माधबी यांच्याबरोबरच पती धवल बुच यांचेही नाव या रिपोर्टमध्ये घेण्यात आले आहे.

या दोघांचा मॉरिशस ऑफशोर कंपनी 'ग्लोबल डायनॅमिक अपॉर्च्युनिटी फंड'मध्ये हिस्सेदारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. आता याचा परिणाम सेबी, शेअर बाजारावर कसा होतो हे उद्या दिसणार आहे. हिंडनबर्गने आरोप करण्याएवढ्या माधबी बुच, धवल बुच आहेत तरी कोण? चला पाहुया...

या कंपनीत भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी यांनी देखील अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केल्याचा दावा हिंडेनबर्गने केला आहे. हा पैसा शेअरच्या किमती वाढवण्यासाठी वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांवर सेबीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसली तरी माधबी बुच यांनी रविवारी सकाळी निवेदन देत आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हणत गुंतवणूक केल्याचे नाकारलेले नाही.

माधबी पुरी बुच यांच्याकडे 2 मार्च 2022 रोजी सेबीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे. त्यापूर्वी त्या सेबीच्या पूर्णवेळ सदस्य होत्या. बाजार नियमन, गुंतवणूक व्यवस्थापन आणि आयटी संबंधित विभागांचे काम ते पाहत होत्या. सेबीने अदानी आणि कोटक महिंद्राबाबतच्या रिपोर्टवरून हिंडनबर्गला नोटीस पाठविली आहे, यानंतर हिंडनबर्गने हे प्रकरण उकरून काढले आहे.

यापूर्वी माधबी यांनी शांघायच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेत सल्लागार पदी, इक्विटी फर्म ग्रेटर पॅसिफिक कॅपिटलमध्ये सिंगापूर प्रमुख म्हणूनही काम केले आहे. त्या आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या MD आणि CEO होत्या. तसेच ICICI बँकेच्या बोर्डावर कार्यकारी संचालक पदीही त्या होत्या.

माधबी बुच या आयआयएम अहमदाबादमधून एमबीए आणि सेंट स्टीफन्स कॉलेज, नवी दिल्ली येथून गणिताच्या पदवीधारक आहेत. तर त्यांचे पती धवल बुच यांनी आयआयटी दिल्लीतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक पदवी मिळविली आहे.

धवल बुच हे युनिलिव्हर कंपनीचे कार्यकारी संचालक, गिल्डन कार्यकारी संचालक होते. सध्या ते Blackstone आणि Alvarez & Marshall चे वरिष्ठ सल्लागार म्हणून काम पाहतात.